जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
6

मुंबई, दि. ७ : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षात मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएलपाठोपाठ कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट याठिकाणी ही मोहीम राबवतानाच मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत एमटीएचएल आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले येथेही स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला.

सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम दुपारी दीडपर्यंत सुरू होती. नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी पार्कजवळील कोस्टल रोडच्या जुळ्या भूमिगत बोगद्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोहिमेला सुरूवात केली. वरळीकडून मुंबईकडे जाणाऱ्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

कोस्टल रोड बोगद्यात देशात प्रथमच सकार्डो प्रणाली

भारतात प्रथमच सकार्डो ही अत्याधुनिक वायूविजन प्रणाली बोगद्यात बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धूर न साठता तो बाहेर फेकण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला.

कोस्टल रोड बोगद्याचा दुसरा टप्पा मे अखेरीस

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडवर टोल नाही असे सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१०० टॅंकर्सच्या वापराने एमटीएचएलवर स्वच्छता मोहीम

मरीन ड्राईव्ह भागातील स्वच्छता मोहीम आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे एमटीएचएलकडे रवाना झाले. तेथे सुमारे १०० टॅंकर्सचा वापर करून रस्ता धुतला जात आहे. या भागात ग्रीन पॅच तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. २२ किमी लांबीचा देशातील पहिला सागरी सेतू असून त्यामुळे मुंबई शहर नवी मुंबई, गोवा, पुणे यांना कनेक्ट होणार आहे. राज्याचा सर्वांत महत्वाकांक्षी आणि गेमचेंजर प्रकल्प असल्याचे सांगत यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे रायगड आज दोन तासांहून अधिक वेळ लागतो. आता मुंबईतून चिर्लेपर्यंत १५ मिनिटात पोहोचणे या प्रकल्पामुळे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चिर्ले येथून मुंबई पुणे आणि त्याचबरोबर गोव्यालादेखील हा सागरी सेतू कनेक्ट करणार आहे. त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉरला कनेक्ट करेल.

अटल सेतू पर्यावरणपूरक प्रकल्प

एमटीएचएल अटल सेतूचा फायदा लाखो लोकांना होणार असून १२ जानेवारीला त्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा सागरी सेतू करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामध्ये स्टील डेक वापरले त्यामुळे जास्तीची वहन क्षमता निर्माण झाली आहे. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे त्यामुळे इथले फ्लेमिंगो जाऊ नये म्हणून काम करत असताना नॉईज बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल आणि टेम्पररी इम्बाक्टमेंट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

चार हावडा ब्रीज होतील, सहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होतील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. पृथ्वीला दोन वेळा प्रदक्षिणा होतील एवढ्या वायर्स ह्या प्रकल्पात वापरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी एमटीएचएल आणि कोस्टल रोड हे दोन्ही गेमचेंजर असून ह्या नवीन वर्षात दोन्ही प्रकल्प सामान्यांना खुले करून त्यांना नव्या वर्षाची भेट मिळणार आहे.