सोलापूरला मिळाली पहिली महिला खासदार प्रणिती शिंदें

0
7

सोलापूर- लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास 75 हजार मतांनी विजय मिळवलाय. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव झालाय. 1951 पासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या. हा इतिहास आज मोडला.
सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशिलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पऱाभवाचा वाचपा काढला आहे.

1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण 2024 च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचला.

प्रणिती शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया
हा सोलापूरकरांचा विजय आहे. जनतेने विश्वास ठेवून मोठी संधी दिली आहे. मी लोकसभेत जाऊन सोलापूरांचे प्रश्न मांडण्यासाठी आतुर आहे . सोलापूरच्या जनतेने भाजपला धडा शिकवला, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

प्रणिती शिंदेंचा राजकीय प्रवास?
आमदार प्रणिती शिंदेनी जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या. तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेनी केला. 2014, 2019 च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही. त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेनी विजयश्री खेचून आणला. सलग तीन वेळा आमदार राहिल्याने सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेची चांगली पकड आहे. तर प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलेच बळ देखील दिले आहे.

सोलापूर मतदार संघाचा इतिहास काय ? 
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाची ओळख होती. 1952 साली सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. सुरुवातीचे पाच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी. एन. राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. 1957 साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले.

मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षांनी सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा उदय झाला. 1996 आणि 2003 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदार संघात गाजवलं. 1962 साली मडेप्पा उर्फ अप्पासाहेब काडादी, 1967, 1971, 1977 सुरजरत्न दमाणी, 1980, 1984 गंगाधर कुचन, 1989, 1991 धर्मन्ना सादुल या काँग्रेस नेत्यांनी सोलापुरात खासदारकीच्या माध्यमातून देशाच्या संसदेत नेतृत्व केलं.