मुंबई, दि. २८ सप्टेंबरः महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील ( SENATE) १० नोंदणीकृत पदवीधर संघासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये ५ जागांसाठी खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले.
तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज ( DT/NT) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून मयुर पांचाळ आणि महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले.या निवडणुकीत युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेनेने १० ही जागा जिंकत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला.
नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण २८ उमेदवार उभे होते. २४ सप्टेंबर २०२४ रोजी एकूण ३८ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. या १० जागांच्या निकालासाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी मतमोजणी पार पडली.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू प्राचार्य अजय भामरे आणि कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. निवडणूकीच्या कामी उपकुलसचिव (निवडणूक) विकास डवरे, सहाय्यक कुलसचिव रमेश दामसे आणि त्यांच्या चमुने अथक प्रयत्न घेतले. आज झालेल्या मतमोजणीसाठी प्रा. बी. के. साखळे, माजी कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, संजय लांब,अजित इंगळे आणि विष्णू नागरे यांच्यासह निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झालेले सर्व उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिवांसह सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.