महिला आयोगाच्या अध्यक्षांना वाय दर्जाच्या सुरक्षेची गरजच काय..?

0
44
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही. त्यांची सुरक्षा तात्काळ काढून घेण्यात यावी अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. रुपाली चाकणकर या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा सोशल मीडियावर रिल प्रसारित करुन हवा करणे व त्यांच्या रील आणि पोस्टला लाईक वाढवणे यासाठीच  वापरतात हे त्यांच्याच सोशल मीडियावरुन अगदी स्पष्टपणे दिसून येते, असे धनंजय जाधव यांनी म्हटले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या जीवितास धोका नसताना त्यांना वाय प्लस सुरक्षा का आणि कशासाठी दिली गेली आहे, असा प्रश्न विचारत राज्यातील महिलांना यातून असुरक्षिततेची भावना वाटु शकते. तसेच सुरक्षा यंत्रणा सोबत असल्याचे रिल तयार करून चाकणकर सोशल माध्यमांवर संबंधित रील प्रसारित करतात, याकडेही धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
राज्यात महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. बलात्कार, हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, छेडछाड अश्या घटना रोज घडत असताना, राज्यातील मुली व महिला किती असुरक्षित आहेत हे स्पष्ट होते. शासनाच्या राज्य महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु वैष्णवी हगवणे आणि मयुरी हगवणे या प्रकरणात महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर व निष्काळजी पणावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परंतु राज्य महिला आयोगाने अन्यायग्रस्त स्त्रियांना सुरक्षा आणि आधार देणे अपेक्षित असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच शासनाची अतिरिक्त सुरक्षा घेऊन फिरावे लागते. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांना महाराष्ट्रात असुरक्षित वाटत आहे काय.? अध्यक्षच स्वतःची सुरक्षितता करू शकत नसतील तर त्या राज्यातील महिलांना कितपत न्याय देतील? त्यांना नेमका धोका कुणापासून वाटतो? महिलांना न्याय देण्याची जबाबदारी असलेल्या आयोगाच्या अध्यक्षांनाच जर या राज्यात असुरक्षित वाटत असेल तर सर्वसामान्य महिलांचे काय .?  राज्यातील पीडित महिलांनी त्यांच्याकडून सुरक्षेची आणि न्यायची अपेक्षा कशी करावी.? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे धनंजय जाधव म्हणाले.
त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची शासकीय सुरक्षा काढून ज्या महिला पीडित आहेत आणि खरोखर ज्यांच्या जीवाला धोका आहे अश्या तक्रारी राज्य महिला आयोगा कडे प्राप्त होतात त्यांना ती सुरक्षा देण्यात यावी व त्यांच्या जीव वाचवावा,अशी विनंती धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आपल्या पत्रातून केली आहे.