महात्मा फुले यांच्या ‘तृतीय रत्न’ नाट्य प्रयोगाने उस्मानाबाद येथील नाट्यरसिक मंत्रमुग्ध

0
25

उस्मानाबाद.दि.25:- राज्य शासनाच्या नागपूर येथील महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) येथील सांस्कृतिक सभागृहात महात्मा जोतिबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाचा प्रयोग आयोजित झाला. या नाटकातील कलावंतांनी सादरीकरणाद्वारे येथील नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध केले.

आनंदनगर मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात रविवारी (दि.22) रोजी केलेल्या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी आणि जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध गायक-नाटककार अनिरुध्द वनकर यांनी केले आहे; तर प्रा.संगिता टिपले या नाटकांच्या क्रिएटिव्ह हेड आहेत. दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्थेतील शिवप्रसाद गोंड यांनी या नाटकासाठी अतिशय अप्रतिम अशी प्रकाशयोजना केली आहे. यातील काही गीतं महात्मा फुले यांची आहेत तर काही अनिरुध्द वनकर यांची आहेत. या नाटकास श्री.वनकर यांनीच खूप छान संगीत दिले आहे. 1880 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेले हे नाटक प्रत्येक रंगमंचावर आणताना त्यावेळच्या काळातील वेशभूषा,भाषा आणि सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून नाटककाराला जे सांगावयाचे आहे ते प्रेक्षकांना विचारमग्न करावयास लावणारे ठरले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील नाट्य कलावंतांनी या नाटकातील पात्र जिवंत केली आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांना जो संदेश द्यावयाचा होता, तो संदेश देण्यात या नाटकातील कलावंत आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.

या नाटकात 23 कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत.

I विद्येविना मती गेली I मतीविना नीति गेली I नीतिविना गती गेली I गतीविना वित्त गेले I वित्तविना शुद्र खचले I एवढे अनर्थ एका अविद्येने केले I

या महात्मा जोतिबा फुले यांनी दिलेल्या संदेशाला दोन तासाच्या नाट्य प्रयोगातून उलगडून दाखविण्यात आले आहे. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. शिक्षण घेतले तर माणूस सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करेल; असा संदेश देताना महात्मा फुले यांनी या नाटकातून अज्ञानी, अंधश्रध्दाळू, अशिक्षिताचा आणि शेतकरी-कष्टकऱ्याचे कर्मकांडाच्या माध्यमातून होणारे शोषण मांडले आहे. अनिष्ट प्रथा आणि अंधश्रध्दावर विश्वास ठेवून कर्जबाजारी होऊन विपन्नावस्थेकडे जाण्यापासून समाजाला वाचविण्यासाठी महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व या नाटकातून सांगितले. ‘तृतीय रत्न’ नाटकातील संदेश आजही कृतीत आणण्याची आवश्यकता, हे नाटक शंभर दीडशे वर्षानंतरही सांगून जाते, अशी भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली.

या नाटकाचे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात महाज्योतीतर्फे प्रयोग सादर करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ.बबनराव तायवाडे, प्रा.दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांच्या प्रयत्नाने या नाटकाचे प्रयोग होत आहेत.

येथील नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणासाठी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष माधव माळी, गौतम क्षिरसागर, कुणाल निंबाळकर, अमोल माळी, पृथ्वीराज चिलवंत, सुरज जानराव, सोमनाथ गोरे, नितीन माने, दयानंद वाघमारे, विनोद माळी, मुकुंद शिंदे, जयाताई बनसोडे, मीरा खोरे, पल्लवी क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी नवज्योत शिंगाडे, बाबासाहेब जानराव, प्रा.आर.व्ही.चंदनशिवे, श्री.रत्नापाली, जे.आर.शिंदे, पी.डी.घोडके, रविंद्र शिंदे, सोपान खिल्लारे आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश माळाळे यांनी केले. यावेळी समता परिषदेच्या वतीने नाट्य कलावंतांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला.