Home मराठवाडा रेती तस्कराचा देवरीच्या तहसील कार्यालयात धिंगाणा, गुन्हा दाखल

रेती तस्कराचा देवरीच्या तहसील कार्यालयात धिंगाणा, गुन्हा दाखल

0

देवरी,दि.19- देवरी तहसीलदारांनी अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कार्यवाही केल्याने चिडलेल्या वाहनमालकाने तहसीलदार यांच्या कार्यालयात धुसून धिंगाणा घातल्याच्या प्रकार काल बुधवारी (दि.18) रात्री सात वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, तेथे कामानिमित्त उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांच्या मोबाईलची तोडफोड करून आरोपी जप्त वाहनासह पसार झाला. सदर प्रकरणी, देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त असेकी, देवरीचे तहसीलदार गौरव इंगोले हे तलाठी तितरे यांचे सह शिलापूर गावाकडे गौणखनिज तपास कामी जात होते. दरम्यान, रस्त्त्यात टिप्प्पर क्र. एमएच ४०-१६१८ हा रेतीची वाहतूक करीत असताना आढळून आला. या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहन हा अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत असल्याने तहसीलदार यांनी जप्तीची कार्यवाही करून सदर टिप्पर ताब्यात घेतला. या प्रकरणाने चिडलेला सदर वाहनाचा मालक आरोपी संतोष अग्रवाल (वय55) आणि कुणाल अग्रवाल (वय25), दोन्ही राहणार साखरीटोला ह्यांनी तहसीलदार देवरी यांच्या कार्यालयात घुसून माझे वाहन का पडकले म्हणून श्री इंगोले यांच्याशी हुज्जत घालणे सुरू केले. यावेळी इतर तलाठी आणि मंडळ अधिकारी सुद्धा कार्यालयात उपस्थित होते. याशिवाय गोंदियाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये हे सुद्धा शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालयात उपस्थित होते. श्री इंगोले हे उपविभागीय अधिकारी यांना देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामात व्यस्त होते. यातील आऱोपी यांनी तहसीलदार देवरी यांचेशी हुज्जत घालून तहसीलदार यांचे कडील काही महत्वाची शासकीय कागदपत्रे हिसकावून घेतली. दरम्यान, तेथे उपस्थित शिक्षणाधिकारी गजभिये यांनी सदर प्रकार आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले. प्रकरण रेकार्ड होत असल्याचे आरोपी कुणाल यांनी आरोपी संतोषच्या लक्षात आणून दिल्याने संतोषने गजभिये यांना शिवीगाळ करून त्यांचे मोबाईल आपटून फोडले. हा फुटलेला मोबाईल आणि जप्ती वाहन व चालकासह आरोपी आपल्या चारचाकी वाहनाने पळून गेला. दरम्यान आरोपीने तहसीलदार देवरी यांच्या टेबलावरील कागदपत्रे फाडून बाहेर फेकल्याचा आरोप आहे.
सदर प्रकरणी देवरी पोलिसांनी अपराध क्र.14/2023 अंतर्गत कलम 353,392,186,427,294,506 आणि 34 अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आनंद घाडगे हे करीत आहेत.

Exit mobile version