बीडमध्ये वाळूमाफीयांची मुजोरी;जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाळू माफियांचा सिनेस्टाईल थरार;घटनेत बॉडीगार्ड जखमी

0
25

बीड:- बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. वाळू माफियावर कारवाई करताना थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे.

छत्रपती संभाजी नगरहून बीडकडे येताना गेवराईजवळ वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या निदर्शनास आला. याच दरम्यान टिप्परवर कारवाई करण्यासाठी मुधोळ यांच्या गाडीने टिप्परला ओव्हरटेक केलं. याच दरम्यान दीपा मुधोळ यांचे बॉडीगार्ड अंबादास तावणे यांनी टिप्पर चालकाला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. तब्बल चार किलोमीटर सिनेस्टाईल हा थरार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळाला. सुदैवाने यात केवळ बॉडीगार्ड जखमी झाला. तर गाडी चालक आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या घटनेत बचावल्या आहेत.

दरम्यान एलसीबीकडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक वाळू उपसा होतो. यावर महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई केवळ तात्पुरत्या स्वरूपात असते. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यापासूनच वाळू माफीया त्यांच्या निशाणावर आहेत. अशातच या घटनेमुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता वाळू माफियांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष केल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.