अजितदादा गटातील आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्लाबोल;गाडीची जाळपोळ,बंगला पेटला

0
6

बीड :- बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. याशिवाय सोळंकेंच्या घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली. सुदैवाने आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे.

आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये घरासह गाड्यांचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव आणि वडवणी तालुका बंदची हाक देण्यात आलीय. असं असताना सर्व आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं होतं. मात्र काही आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत ही तुफान दगडफेक केल्याचा आरोप आहे. या दगडफेकीमुळे परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.