Home मराठवाडा कुस्ती स्पर्धेमुळे मराठवाड्यातील नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल- मंत्री संजय बनसोडे

कुस्ती स्पर्धेमुळे मराठवाड्यातील नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल- मंत्री संजय बनसोडे

0

लेझर शो’च्या माध्यमातून उलघडला कुस्तीचा वैभवशाली इतिहास

फटाक्यांच्या आतिषबाजीने उद्घाटन सोहळा बनला रंगतदार

स्पर्धेत सहभागी झालेल्या कुस्तीपटूंचे पथसंचालन

लातूर, दि.10: मराठवाड्यामध्ये कुस्ती लोकप्रिय असून लातूर जिल्ह्यालाही कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. या मातीमध्ये रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार, अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्यासारखे अनेक दिग्गज कुस्तीपटू घडले आहेत. स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमुळे नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल आणि स्व. खाशाबा जाधव यांचे स्वप्न साकार करणारे खेळाडू मराठवाड्याच्या मातीत घडतील, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

 

उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे ८ ते १२ मार्च या कालावधीत आयोजित स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिल्पाताई संजय बनसोडे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस, युवराज नाईक, जगन्नाथ लकडे, अर्जुन पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार, माजी आमदार गोविंद केंद्रे, दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, ट्रीपल केसरी पै. विजय चौधरी, पै. नामदेव कदम, पै. बापूसाहेब लोखंडे, पै. सय्यद चाऊस, पै. अस्लम काझी, समीर शेख, संग्राम पाटील, तहसीलदार राम बोरगावकर,  गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असून नुकत्याच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत राज्याला अव्वल स्थान मिळवून दिले. त्याचप्रमाणे विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे राज्यभर भव्य आयोजन करण्यात येत असून मराठवाड्यातील नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा उदगीर येथे आयोजित करण्यात आल्याचे मंत्री श्री. बनसोडे म्हणाले.

उदगीर तालुक्यातील खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा मिळाव्यात, याकरिता उदगीर तालुका क्रीडा संकुलासाठी १४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून याशिवाय तोंडार येथे अद्ययावत ८२.३३ कोटी रुपये निधीतून अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. तसेच स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील उत्कृष्ट कुस्तीपटू उदगीर नगरीत आले असून ग्रीक रोमन, फ्री स्टाईल आणि महिला गटातील कुस्ती पाहण्याची संधी यामुळे जिल्हावासियांना मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेस उपस्थित राहून कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू प्रदीप देशमुख यांनी उपस्थित खेळाडूंना शपथ दिली. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाचा समारोप झाला. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यांच्या नामफलकांसह पथसंचलन केले.

लेझर शो, फटाक्यांची आतिषबाजी आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात आणली रंगत

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी लेझर शो आणि फटाक्यांची आतिषबाजी दाखविण्यात आली. या लेझर शोच्या माध्यमातून कुस्ती या क्रीडा प्रकारची सुरुवातीपासून ते आजपर्यंतची वैभवशाली परंपरा उलघडून दाखविण्यात आली. तसेच यावेळी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे उद्घाटन सोहळा रंगतदार बनला. प्रख्यात अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचा नृत्याविष्कारही यावेळी सादर झाला.

Exit mobile version