परभणी, दि. २३ – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जावून सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजपुरे उपस्थित होते.श्रीमती बोर्डीकर यांनी सोमनाथ यांच्या आई व भावांकडून त्यांची व्यथा ऐकून घेतली. परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केल्या जाईल. घटनेची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल, असे श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती बोर्डीकर यांनी परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पुतळा परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली.त्यानंतर श्रीमती बोर्डीकर यांनी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुलनगर स्थित घरी जावून सांत्वनपर भेट घेतली.
जिल्ह्याने एक चांगला लोकनेता गमावला याचे दुःख आहे. विजय वाकोडे यांचा अनेक लोकचळवळीत सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या जाण्याने समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.श्रीमती बोर्डीकर यांनी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली.