Home राष्ट्रीय देश २०१५ मध्ये पगारवाढ आणि नोक-याही वाढणार

२०१५ मध्ये पगारवाढ आणि नोक-याही वाढणार

0

नवी दिल्ली- २०१५ वर्ष येण्यासाठी अवघे १५ दिवस राहिले असतानाच नोकरीच्या बाजारात ‘सुगीचे दिवस’ येण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतातील कंपन्यांनी अधिकाधिक भरती करण्याचे ठरवले असून दणदणीत पगारवाढ देण्याचे संकेत दिले आहेत.
नवीन वर्षात ५ लाख नवीन नोक-या तयार होणार आहेत. तसेच प्रत्येक कंपनी आपल्या मनुष्यबळात १५ ते २० टक्के वाढ करणार आहे. तसेच बहुतांशी कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना १० ते ३० टक्क्यांपर्यंत पगारवाढ देण्याचे निश्चित केले आहे. देशातील सर्व क्षेत्रातील कंपन्यांनी हे धोरण आखले आहे.
सर्वच कंपन्यांनी महत्त्वाकांक्षी विस्तार हाती घेतला आहे. त्यामुळे कंपन्यांनी २०१५ मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचा-यांची भरती करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती विविध मनुष्यबळ संस्था आणि नोकरीबाबत सल्लागार कंपन्यांनी दिली.
देशाची अर्थव्यवस्था वाढत असून उद्योगांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेच कंपन्यांनी कर्मचा-यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यमान कर्मचा-यांना दुहेरी पगारवाढ देण्याचे ठरवले आहे.
जागतिक पातळीवरील मनुष्यबळ विकास संस्था ‘एऑन हेविट’ने सांगितले की, २०१४ मध्ये देशातील ५०० कंपन्यांमध्ये १० टक्के वेतनवाढ झाली होती. आता २०१५ मध्ये १५ टक्के पगारवाढ अपेक्षित आहे.
‘हाय ग्रुप’ या संस्थेने सांगितले की, भारतीय कंपन्या २०१५ मध्ये १०.५ टक्के पगारवाढ देणार आहेत. आशियातील अन्य देशांपेक्षा भारतातील परिस्थिती अधिक चांगली आहे.
‘मर्सर’ या जागतिक दर्जाच्या सल्लागार संस्थेने सांगितले की, भारतीय कंपन्या पुढील वर्षी ११ टक्के पगारवाढ देण्याच्या तयारीत आहेत.
माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य, एफएमसीजी, वित्तसंस्था, दूरसंपर्क आदी क्षेत्रातील सर्वच कंपन्या मोठय़ा प्रमाणावर नोकरभरती करणार आहेत, असे ‘टीमलीज सर्व्हिसेस’चे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल सेन यांनी सांगितले.
आपल्या कर्मचा-यांना टिकवून ठेवण्यासाठी या कंपन्या वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत. यात निवृत्तीपश्चात योजना, वित्त नियोजन, आरोग्यविषयक योजना आदींचा त्यात समावेश आहे.
‘वर्कफोर्स सोल्यूशन्स’ने स्पष्ट केले की, जानेवारी ते मार्च दरम्यान भारतात मोठय़ा प्रमाणावर नोकरभरती होणार आहे. जगात सर्वाधिक नोकर भरतीची शक्यता भारतातच होईल.
देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. अनेक कंपन्यांनी मोठया प्रमाणावर भरती करण्याचे ठरवले आहे. पायाभूत, ऊर्जा, वीज, उत्पादन, माहिती-तंत्रज्ञान, रिटेल, इ-कॉमर्स, बॅँकिंग आदी क्षेत्रांमध्ये मोठी नोकरभरती अपेक्षित आहे.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या योजनेअंतर्गत येत्या १० वर्षात उत्पादन, खाण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात एक कोटी रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच देशात १०० स्मार्ट सिटीज उभारल्या जाणार आहेत. त्यातूनही मोठा रोजगार निर्माण होईल.

Exit mobile version