अहिल्यानगर : दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या राज्यात सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवत आहे. मात्र या अभियानाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या एका नायब तहसीलदारांनीच काळ फासला आहे.
या पठ्ठाने आपल्या मुलासाठी थेट परीक्षा केंद्रावर जाऊन कॉपी पुरवण्याचा प्रताप समोर आला आहे. एवढेच नाहीतर जेव्हा कर्मचाऱ्यांनी या तहसीलदाराला पकडलं तर त्यांच्याशीच अरेरावी करत होता.
संत भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज तनपुरवाडी येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. अनिल तोडमल असं या नायब तहसीलदाराचं नाव आहे. अनिल तोडमल हे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदारावर कार्यरत आहे. त्यांच्या मुलाचं परीक्षा केंद्र हे संत भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज आहे. आपण तहसीलदार असल्याचा आव आणत तोडमल हे थेट लेकराला कॉपी पुरवण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले. परीक्षा सुरू झाल्यापासून तोडमल या परीक्षा केंद्रावर उपस्थित असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कॉलेजमध्ये येऊन नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना ताब्यात घेतले. जेव्हा त्यांची चौकशी सुरू केली तेव्हा आपण तर मुलाला सोडायला आलो होतो, अशी बोलबच्चनगिरी सुरू केली.