ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात- अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे

0
13
परभणी, दि. 3  : दैनंदिन जीवनात ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तुंची खरेदी करावी लागते तसेच त्यांना विविध सेवाही दिल्या जातात. या दरम्यान त्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने संबंधित विभागाने निराकरण करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकरी डॉ. प्रताप काळे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातआज पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी जिवराज डापकर, परिषदेचे सदस्य डॉ. विलास मोरे, विभागप्रमुख यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.प्रारंभी मागील बैठकीत प्राप्त तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. काळे म्हणाले की, ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ही महत्त्वाची समिती आहे. समितीकडे प्राप्त तक्रारी आणि प्रलंबित तक्रारींचे सात दिवसांत निराकरण करावे. याबाबत समितीतील सर्व सदस्यांनाही वेळेत माहिती उपलब्ध करुन द्यावी.
दरम्यान, 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने 15 ते 30 मार्च या कालावधीमध्ये ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करण्यात यावा. या दरम्यान, ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात याव्यात, अशी सूचनाही डॉ. काळे यांनी यावेळी केली.