39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home मराठवाडा/खान्देश जिद्दच माणसाला यशस्वी बनवते- वसंत कोठेवाड

जिद्दच माणसाला यशस्वी बनवते- वसंत कोठेवाड

0
27

blank

कंधार, दि. ०3- जगताना जवळ कोणतेही साधन नसतानाही केवळ जिद्दीच्या बळावरच अनेकांनी यश संपादन करता येते, हे सिद्ध केले आहे. म्हणून परिस्थितीचा बाऊ न करता जिद्द बाळगून ध्येयाच्या दिशेने चालत रहा, यश खात्रीपूर्वक मिळेलच. म्हणून शिक्षण आणि ज्ञानाला जिद्दीची जोड मिळाली तर ती माणसाला यशस्वी बनवते, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी वसंत कोठेवाड यांनी केले.
लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती, लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संगुचीवाडी ता. कंधार या शाळेचा वर्धापन दिन आणि शेतकरी नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र येईलवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी कोठेवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. येईलवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे उपस्थित होते.
समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी झाल्या व्यक्तींचे उदाहरणे देत शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे म्हणाले, माणसे नेहमी परिस्थितीचे भांडवल करून पळवाट शोधत असतात. तीच पळवाट त्याच्या आयुष्याचा धोपट मार्ग रोखून धरणारी आहे. परिस्थितीशी संघर्ष करत आपले ध्येय निश्चित करून ज्यांनी वाटचाल केली, तीच माणसे आज जगाच्या इतिहासात नोंदवली गेली आहेत. ही ताजे उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवून नव्या पिढीला चेतवण्याचे काम पालकांकडून होणे गरजेचे आहे. बुद्धी हीच खरी आपली संपत्ती आहे. ती संपत्ती शिक्षण आणि ज्ञानातून मिळते. म्हणून बुद्धीची ताकद वापरून जीवनात यशस्वी व्हावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षणच माणसाला आरपार बदलू शकते. शिक्षणानेच जगात क्रांती झाली आहे. ही क्रांती सामाजिक, वैज्ञानिक अंगाने जगात होत गेली. त्यातून एक समतेचा समाज जगभरात निर्माण होत आहे. म्हणून खेड्यापाड्यातील मुलांनी उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगून आपली वाटचाल करावी. याच शिक्षणातून तुमचे जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही, अशी अपेक्षा श्री. रामचंद्र येईलवाड यांनी अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केली.
यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष गुण घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कोठेवाड यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधर येईलवाड, प्राचार्य नामदेव कदम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खुड्याचीवाडी, कलंबर, संगुचीवाडी, पांगरा येथील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मारोती कोठेवाड यांनी केले. सूत्रसंचालन शेख रहेमत यांनी केले तर आभार प्रा. फुगनर यांनी मानले.

blank