सतीश कौशिक यांचे 66 व्या वर्षी निधन

0
21

66 वर्षीय अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी मध्यरात्री दिल्लीत हार्ट अटॅकमुळे निधन झाले. ते 8 मार्च रोजी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते. तिथे रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मध्यरात्री 1.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली.

सतीश कौशिक यांचा पुतण्या निशांत कौशिक यांनी सांगितले की, त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच हृदयविकाराचा धक्का आला आणि ते गेले. आज दुपारी 3 ते 6 दरम्यान त्यांच्या पार्थिवावर वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. दिल्लीच्या दीन दयाल रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर दिल्लीहून मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आणला जाईल. त्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया होईल.

अनुपम खेर म्हणाले – तुझ्याशिवाय आयुष्य आता पूर्वीसारखे राहणार नाही

अनुपम खेर, सतीश कौशिक श्रद्धांजली वाहताना म्हणाले, ‘माहिती आहे, मृत्यू या जगाचे अंतिम सत्य आहे. पण ही गोष्ट मी कधी माझा जिवलग मित्र #SatishKaushik यांच्याविषयी लिहिले, असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम!! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम शांति!’

दोन दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांच्या होळी पार्टीत सहभागी झाले होते
7 मार्च रोजी जानकी कुटीर जुहू येथे जावेद अख्तर यांनी आयोजित केलेल्या होळी पार्टीत कौशिक यांनी होळी खेळली होती. त्यांनी या आनंदोत्सवाचे फोटो देखील ट्विट केले होते. त्यात लिहले होते की, जावेद अख्तर, शबाना आझमी, बाबा आझमी, तन्वी आझमी यांनी आयोजित केलेल्या होळी पार्टीत रंगीबेरंगी होळीचा आनंद घेतला. अली फलाज आणि ऋचा चढ्ढा हे नवविवाहित जोडपे भेटले. सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

हरियाणात जन्म, शालेय शिक्षण दिल्लीत झाले
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1965 रोजी हरियाणामध्ये झाला. शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोडी माल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा(NSD) मध्ये प्रवेश घेतला. 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिकसोबत लग्न केले. दोन वर्षांचा असतानाच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

मिस्टर इंडियातून खरी ओळख मिळाली
सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केले. ते एक अभिनेता, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते. सतीश कौशिक यांना 1987 मध्ये आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातून अधिक ओळख मिळाली. त्यानंतर 1997 मध्ये आलेल्या दिवाना-मस्ताना मध्ये पप्पू पेजरची भूमिका केली. सतीश यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये ‘साजन चले ससुराल’ साठी सर्वोत्कृष्ट विनोद कलाकार हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.