केंद्र सरकारने लाँच केली नवीन भारत सीरिज; आता गाडीच्या नंबरपुढे येणार BH अक्षरे

0
99

नवी दिल्ली : जर तुम्हाला वारंवार पत्ता बदलावा लागत असेल आणि तुमच्या वाहनाची तुम्ही प्रत्येकवेळी नोंदणी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेतून जाण्याच्या कटकटीपासून वाचू इच्छित असाल तर अशा वाहनधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण सर्व वाहनांमध्ये भारत सीरिज (Bharat series) किंवा ‘बीएच’ (BH) नावाने नवीन वाहन नोंदणी चिन्ह केंद्र सरकारने सादर केले आहे.

शुक्रवारी भारत सीरिज वाहनांची अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केली आहे. नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची नवीन बीएच सीरीज वाहनांना आवश्यकता नाही आणि ती देशभरात वैध असेल. संरक्षण कर्मचारी तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा स्वैच्छिक आधारावर उपलब्ध असेल. या सुविधेचा लाभ चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांचे कर्मचारीही घेऊ शकतात.

नोकरीसाठी परराज्यात स्थलांतर करणाऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. हे प्रत्येक वेळी नवीन राज्यात जाताना त्यांच्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी बेस शिफ्ट करण्यास लोकांना मदत करेल.

वाहन मालकाला मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 47 नुसार आपले वाहन ज्या राज्यातील वाहन आहे, त्या राज्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवण्याची परवानगी नाही. मालकाला निर्धारित कालावधीत नवीन राज्य प्राधिकरणासह नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.

YY BH 4144 XX YY असे BH नोंदणीचे स्वरूप ठेवले आहे. यातील YY म्हणजे फर्स्ट रजिस्ट्रेशन असे असेल. जर तुमची गाडी या वर्षातील असेल, तर तुमच्या गाडीचा नंबर 21BH1234MH असा असू शकतो. अर्थात ही सुविधा वैकल्पिक आहे. अधिसूचनेत असे देखील सांगण्यात आले आहे की दोन वर्षांसाठी किंवा 4, 6, 8 वर्षांसाठी बीएच सीरीज अंतर्गत मोटार वाहन कर आकारला जाईल. नवीन राज्यात खाजगी वाहनांना स्थलांतरित केल्यावर या योजनेमुळे मोफत प्रवास करता येईल. मोटार वाहन कर चौदाव्या वर्षानंतर दरवर्षी आकारला जाईल, जो त्या वाहनासाठी पूर्वी गोळा केलेल्या रकमेच्या निम्मा असेल.