Home राष्ट्रीय देश समाजातून नकारात्मक विचार दूर करण्याचे काम युवकांनी केले पाहिजे

समाजातून नकारात्मक विचार दूर करण्याचे काम युवकांनी केले पाहिजे

0

◆ युवक बिरादरी आयोजित ताज मीट 2022 येथे आगरा महानगर पालिका आयुक्त निखिल फुंडे यांचे प्रतिपादन

आगरा:आग्रा येथे युवक बिरादरी भारत द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा “ताज मीट 2022” येथे युवकांना आग्रा महानगरपालिकेचे आयुक्त निखिल फुंडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि देशाच्या विविध भागातील 100 युवक सहभागी झाले होते.

नेतृत्व, व्यक्तिमत्व आणि जबाबदारी या तीन गोष्टी निखिल फुंडे जी यांनी विविध उदाहरणांसह तरुणांसमोर ठेवल्या. अभ्यासापासून ते व्यावसायिक जीवनातील समस्या आणि परिस्थितीनुसार त्या कोणत्या मार्गाने त्या सोडवाव्या लागतात, यासह विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. समाजातून नकारात्मक विचार दूर करण्याचे काम युवकांनी केले पाहिजे. जीवनात चढ-उतार येतील, पण आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन आपले जीवन आणि समाजाचे जीवन यशस्वी करायचे आहे, त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, अशा प्रेरणादायी शब्दांत निखिल फुंडे जी यांनी तरुणांशी संवाद साधला.

युवक बिरादरीच्या विश्वस्त स्वर क्रांती यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान महाविद्यालयीन जीवन, आवडत्या गोष्टी, आवडती पुस्तके, लेखक-कवी याबद्दलही निखिल फुंडे यांनी उत्तरे दिली. यावेळी व्यासपीठावर आग्रा येथील साहित्यिक अरुण डंग आणि ज्येष्ठ बिरादर जगतसिंग फौजदार उपस्थित होते.युवक बिरादरीचे संस्थांपक पद्मश्री क्रांती शाह यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कार्यक्रम ‘एक सुर एक ताल’ कार्यक्रमातील काही गीत यावेळी युवकांनी सादर केले.

राष्ट्रीय स्तरावर सामाजिक जबाबदारीचे संस्कार, व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी युवक बिरादरी (भारत) द्वारे ग्रैंड हॉटेल आग्रा येथे ही युवकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये छावणी भूषण पुरस्कार पायल लुनाविया (गुजरात), खुशिया काथोटे (महाराष्ट्र), प्रत्यूष शर्मा (उत्तरप्रदेश) यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय देण्यात आले. त्याचबरोबर पटकथा लेखनासाठी विशेष पारितोषिक भिंभा हिरवा (गुजरात) यांना देण्यात आले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे निवृत्त मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश कुमार त्यागी, आयटी क्षेत्रातील तज्ञ अपूर्व मंकड, युवक बिरादरीच्या संचालक विश्वस्त तथा मुंबईस्थित वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक स्वर क्रांती, तरुण उद्योजक धवल फडके, मेधा दिवेकर, बी. पी. टी. मुंबईचे अधिकारी निहार देवरुखकर, ज्येष्ठ पत्रकार पंकज इंगोले, ज्येष्ठ रंगकर्मी नागेंद्र राय आदी मान्यवरांनी चार दिवसांमध्ये मार्गदर्शन केले. उत्तर प्रदेश बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष अरुण डंग या कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष होते. या सर्व मान्यवरांनी विविध क्षेत्रांच्या बद्दल माहिती दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांच्या मार्गदर्शनात आणि व्यवस्थापकीय विश्वस्त स्वर क्रांति यांच्या नेतृत्वात कार्यशाळेचे संचालन व व्यवस्थापन कार्य. प्रकल्प प्रमुख डॉ. स्वप्नील यादव, सुचित्रा गायकवाड, प्रशांत वाघाये, सचिन वाकूलकर, ओंकार चव्हाण यांनी केले .

Exit mobile version