सरस फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

0
21

नवी दिल्ली, दि. 3 : सरस फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली असून दिल्लीकर खवय्ये वडापाव, मिसळपाव, आगरी मटण तसेच चिकन आणि पुरणपोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.

बाबा खडक सिंग मार्गस्थित एम्पोरियम भवन परिसरात सरस फूड फेस्टिव्हल 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये 17 राज्यांची 21 खाद्यपदार्थांची दालने आहेत. बचत गटांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पक्वान्नांना येथे मांडण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्राची दोन दालने आहेत. एक नंदूरबार आणि दुसरे ठाण्यातील आहे

राजधानीत सध्या थंडीची चाहूल लागली आहे. अशा वातावरणामध्ये या परिसरात सर्वत्र राज्या-राज्यातील देशी खाद्य पदार्थांचा खमंग सुवास दरवळतो आहे. हिमाचल प्रदेश ते केरळपर्यंतच्या खवय्यांना आवडणारे  शाकाहारीसह मांसाहारी पदार्थ ताजे वाढले जात आहेत.

यात महाराष्ट्राचा वडापाव, दाबेली, मिसळपाव, तोंडाला पाणी सोडतात तर  पुरण पोळीने जिभेवर एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे येथे दिसून आले. हे अधिक खाल्ले जाणारे पदार्थ ‘दशमा’ महिला बचत गट, नंदूरबार येथील आहेत. तर कोल्हापूर मटण नुसत ऐकूण असणारे खवय्ये डोळयात पाणी आणूनही खाण्यात दंग दिसले. यासह आगरी मटण, आगरी चिकण, कोळंबी रस्सा, भात, पोळी, तांदळाची भाकरी हे दिल्लीकरांसाठी नवीन असणारे पदार्थही खवय्ये चाखूण पाहत आहेत. हे दालन श्री कृपा बचत गट, ठाणे यांचे आहे.

प्रथमच देशाच्या राजधानीत स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने सुरूवातीला असणारी धाकधूक खवय्यांनी ‘और एक’ अशी फर्माईश करत दूर करून आत्मविश्वास वाढला. घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ इतर राज्यातील लोकांपुढे मांडताना शेफ म्हणून टॅग लागतो तेव्हा मन सुखवून जाते अशी प्रतिक्रिया या बचत गटातील महिलांनी दिली.

या ठिकाणी खवय्यांनी खाद्यपदार्थांचा निवांत आस्वाद घ्यावा, यासाठी टोकन व्यवस्था केलेली आहे. स्टॉल्स आकर्षक आणि स्वच्छ आहेत. या ठिकाणी दररोज एक सांस्कृतिक कार्यक्रमही दाखविण्यात येतो.  हे फूड फेस्टिव्हल 27 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून  ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत विनाशुल्क सर्वांसाठी खुले आहे.