Home राजकीय खडसेंच्या बंगल्यावर आता शिंदेंचा मुक्काम

खडसेंच्या बंगल्यावर आता शिंदेंचा मुक्काम

0

नागपूर : गत हिवाळी अधिवेशनाच्या काळात युतीतर्फे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यात आघाडीवर असलेले तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे या दोन्ही नेत्यांची या अधिवेशनातील भूमिका मात्र परस्परांच्या विरोधात असणार आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या बंगल्यात खडसे यांचा मुक्काम राहात होता त्याच बंगल्यात बसून शिंदे आता विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या विरोधात रणनीती आखतील.

विरोधी पक्ष नेत्याच्या बंगल्याचे हस्तांतरण अशा प्रकारे. एका एकनाथाकडून दुसऱ्या एकनाथाकडे या निमित्ताने होण्याचे चित्र पाहायला मिळेल. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचे परिणामही नागपूर अधिवेशनात पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत विरोधी बाकावर बसणारा भाजप यावेळी सत्ताधारी पक्ष असला तरी त्यांचा मित्र पक्ष मात्र सत्तेच्या बाहेर आहे. विशेष म्हणजे तो प्रमुख विरोधी पक्ष आहे. आघाडी सरकारच्या काळात एकनाथ खडसे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. ते अधिवेशनाच्या एक दिवस आधी त्यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना बोलवून सरकार विरोधात रणशिंग फुंकायचे. त्यावेळी मित्रपक्षाचे प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदेही तेथे उपस्थित असत. या अधिवेशनात अगदी याविरोधात चित्र पाहायला मिळेल. खडसे आणि शिंदे यांचा मुक्काम एकाच परिसरात (रविभवन परिसर) राहणार असला तरी भूमिका वेगवेगळ्या असतील. खडसे यांना मंत्री म्हणून वेगळा बंगला मिळेल तर शिंदे यांना आतापर्यंत खडसेंना मिळणारा विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला मिळेल त्यामुळे गत पाच वर्षात ज्या बंगल्यात खडसेंच्या उपस्थितीत सरकार विरोधात लढण्याची व्यूव्हनीती ठरत होती आता त्याच बंगल्यात शिंदेंच्या उपस्थितीत भाजप सरकारला खिंडीत पकडण्यासाठी डावपेच आखले जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version