
फडणवीस स्वत: गोयलांशी बोलले होते; पंतप्रधानांच्या भाषणानंतर ‘ते’ ट्विट व्हायरल
नवी दिल्ली : मुंबईत काँग्रेसने मोफत तिकीट वाटून नागरिकांना उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाठवले. त्यामुळे देशात कोरोना वाढल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. तर सोशल मीडियात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची त्यावेळची ट्विट व्हायरल झाली आहेत.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण देताना मोदी यांनी सोमवारी काँग्रेसवर चौफेर टीका केली. देशात कोरोना पसरण्यास पंतप्रधानांनी थेट काँग्रेसलाच जबाबदार धरले. त्यानंतर सोशल मीडियात फडणवीस यांचे 9 मे 2020 रोजीचे ट्विट व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी मजूरांसाठी मुंबईतून रेल्वेगाड्या सोडण्याबाबत पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री मा. श्री पीयूष गोयल जी से चर्चा की।
उनका बहुत बहुत आभार!
उन्होंने तुरन्त उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री श्री योगीजी से चर्चा की और जल्द ही मुंबई से १० ट्रेन (रेल गाड़ियाँ) उत्तरप्रदेश के लिए रवाना होगी.#IndiaFightsCorona @PiyushGoyal @myogiadityanath— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 9, 2020
तसेच गोयल यांनी लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आणि मुंबईतून लवकरच 10 रेल्वे उत्तर प्रदेशात रवाना केल्या जातील, असे सांगितल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी सर्व मजूरांना आवाहन केले होते. सर्व मजूर बांधवांना माझी विनंती आहे की, नोंदणी करून सरकारच्या माध्यमातून आपला प्रवास करावा. पायी प्रवास करू नये, असं फडणवीस म्हणाले होते.
महाराष्ट्र से आज शाम 6:00 PM बजे तक 145 में से 85 ट्रेनों को चलना था, जिसमें से राज्य सरकार द्वारा यात्रियों की अरेंजमेंट ना करने के कारण मात्र 27 ही चल पाई।
महाराष्ट्र सरकार से मेरा पुनः निवेदन है कृपया गरीब मजदूरों को उनके घर पहुंचाने के लिये हमारी सहायता करें।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 26, 2020
फडणवीस यांच्यासह गोयल यांचेही 26 मे 2020 रोजीचे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यावेळी रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र सरकारमध्ये वादही रंगला होता. ‘महाराष्ट्रातून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत 145 पैकी 85 रेल्वे चालवल्या जाणार होत्या. पण राज्य सरकारमार्फत प्रवाशांची व्यवस्था न करण्यात आल्याने केवळ 27 रेल्वे सोडल्या. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की, कृपया गरीब मजूरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी आमची मदत करावी,’ असं गोयल म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात लॅाकडाऊन होता. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देश लॅाकडाऊनचे समर्थन करत होते. जे लोक जिथे आहेत. त्यांनी तिथेच राहावे, असे सांगत असताना मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश, बिहारमधील नागरिकांना परत जाण्यासाठी मोफत तिकिट वाटले. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. हे काम करुन काँग्रेसने आपल्यावरील जबाबदारी झटकली, अशी टीका मोदींनी केली आहे.
त्याच बरोबर दिल्ली सरकारनेही नागरिकांना आपल्या गावी परत जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होते. मुंबई आणि दिल्लीतून गेलेल्या नागरिकांमुळे या राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले. हे पाप काँग्रेसने केले, असा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता.





