उद्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणारच! -खासदार नवनीत राणा

0
72

हनुमान चाळिसा न म्हण्णारे उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात साडेसाती सुरू आहे. हे रोखण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसाचे पठन करणार आहोत. मातोश्रीवर जाण्यावर आपण ठाम आहोत, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत आज दाखल झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सुन आहे. त्यामुळे मुंबईत येण्यापासून मला कुणी कधीही रोखू शकत नाही. उद्या कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीबाहेर आम्ही हनुमान चालिसा पठण करणारच, असा निर्धार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

मुंबईत वातावरण बिघडवण्याचा हेतू नाही!
मुंबईत वातावरण बिघडवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. शिवसैनिकांनी आम्हाला मुंबईत पाय ठेवून दाखवा, अशी धमकी दिली होती. पण आज आम्ही मुंबईत आहोत. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असे रवी राणा म्हणाले. तसेच, मुंबईच्या नागरिकांना त्रास देण्याचा आमचा कोणताही हेतु नाही. तरीदेखील पोलिसांकडून आज आम्हाला शांतता ठेवावी, अशी नोटीस देण्यात आली. हनुमान चालिसा म्हटल्यामुळे शांततेचा भंग होता का, असा सवाल रवी राणा यांनी केला. तसेच, उद्या आम्ही शांततेनेच मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार आहोत. खरे शिवसैनिक आम्हाला विरोध करणार नाहीत. मात्र स्थिती बिघडल्यास त्याला शिवसैनिकच जबाबदार असतील, असे रवी राणा म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रावर विघ्न!
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लागली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न चिघळला आहे. राज्यावर वीजेचे संकट आहे. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. मात्र मुख्यमंत्री कधीही मातोश्रीबाहेर निघत नाही. ते विदर्भाच्या दौऱ्यावरही येत नाहीत. त्यामुळे राज्यावरील हे विघ्न दुर व्हावे यासाठी हनुमान जंयतीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी, अशी आमची विनंती होती. मुख्यमंत्र्यांनी आमची विनंती मान्य करायला हवी होती. मात्र महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर ते हिंदुत्व विसरले. हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

मी मुंबईची मुलगी, विदर्भाची सुन – नवनीत राणा
पत्रकार परिषदेत नवनीत कौर राणा म्हणाल्या, मी मुंबईची मुलगी असून विदर्भाची सुन आहे. त्यामुळे मुंबईत येण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. आम्ही धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मुंबईला आलो आहोत. बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणालाही घाबरले नाहीत. मात्र, उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी विचारांना तिलांजली दिली आहे. त्यामुळेच आपण मुंबईला आलो, असे नवनीत राणा म्हणाल्या.