वेळ पडल्यास विरोधात बसा-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले

0
96

गोंदिया :जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (दि .२) जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बोदलकसा येथे बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला.काहीही झाले तरी एकही सदस्य भाजपकडे जाऊ नये, वेळ पडल्यास विरोधात बसू; पण महाविकास आघाडीचा धर्म मोडायचा नाही , अशा स्पष्ट सूचना त्यांनी काँग्रेसच्या सदस्यांना केल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्य एकत्रित आल्यास त्यांना सुद्धा सत्ता स्थापन करता येऊ शकते; पण मागील काही जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव पाहता तसे होण्याची शक्यता कमी आहे.मात्र,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी जिल्हा परिषद निवडणुकी बाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली. सत्ता स्थापन करू तर महाविकास आघाडीसह, नाही तर विरोधात बसू, हाच फॉर्म्युला भंडारा जिल्हा परिषदेसाठी लागू राहील, हे देखील स्पष्ट केले. त्यामुळे भंडारा जि .प.वर महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेतसुद्धा अपक्ष सदस्यांच्या मदतीने महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड आणि इतर नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह चर्चा केल्याचे बोलले जाते. त्यामुळे यावरील निर्णयाचा चेंडू आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर्टात गेला आहे.

सभेला प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा निरिक्षक नाना गावंडे, प्रदेश महासचिव डॉ. एन. डी. किरसान, आमदार सहसराम कोरोटे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बन्सोड, भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश सचिव राजाभाऊ तिडके, अमर वराडे व पी.जी.कटरे, माजी जि.प. अध्यक्ष के.आर. शेंडे, बाळासाहेब कुलकर्णी, वरिष्ट जिल्हा उपाध्यक्ष अशोक (गप्पु) गुप्ता, माजी जिल्हाध्यक्ष भंडारा मधुकर लिचडे, प्रमोद तितरमारे दोन्ही जिल्ह्यातील जि.प. व पं.स. सदस्य, व सर्व तालुकाध्यक्ष उपस्थीत होते.