
अमरावती,दि.३१ (प्रतिनिधी):वाढती महागाई व बेरोजगारी विरोधात आज मंगळवारी डावी आघाडी व जिल्हा ट्रेड । युनियन कौन्सिल ( सिटू) च्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
डाव्या पक्षांनी व संयुक्त कामगार – किसान संघर्ष समन्वय समितीने केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज जिल्हधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे करण्यात आले. वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर देशव्यापी निषेध सप्ताह पाळण्याचे तसेच निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार डावी आघाडी व सिटूच्या वतीने केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला. तसेच इंधन दरवाढ कमी करून सर्व प्रकारचे सेस, सरचार्ज मागे घ्यावे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्ववत करावे, सार्वजनिक वितरण अंतर्गत सर्व जीवनावश्यक वस्तू विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा करण्यात यावा, तसेच आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबियांना दरमहा ७ हजार ५०० रुपये देण्यात यावे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करावी. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा लागू करण्यात यावा, तसेच रिक्त जागा सोबतच पीक कर्ज वाटप करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्य सचिव तुकाराम भस्मे, राज्य कमिटी सदस्य सुभाष पांडे, अशोक सोनारकर, रमेश सोनुले, जे एम कोठारी, सुनील देशमुख, नीळकंठ ढोके, चंदा वानखडे, शरद मंगळे, मुकुंद काळे, सफिया खान, रेहाणा खान, आशा वैद्य, ललिता वासनिक, दुर्गा वासनिक, ज्योती नालट, नलू इंगोले आदी उपस्थित होते.