-पक्षांतील अंतर्गंत वाद पुन्हा चव्हावट्यावर
गोंदिया- : भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये बाहेरचा विरुद्ध जिल्ह्यातील असा वाद सुरू असल्याच्या पार्श्वूमीवर साकोली चे माजी आमदार राजेश ऊर्फ बाळा काशिवार यांनी प्रदेश कार्यकारिणीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी जिल्हा भाजपची सध्याची स्थिती बघता आपण संघटनात्मक कार्य करण्यास मानसिकदृष्ट्या असमर्थ असल्याचे म्हटले आहे.
भंडारा जिल्ह्यात खासदार सुनील मेंढे आणि विधान परिषद सदस्य डा. परिणय फुके यांच्यात जिल्हा पक्ष संघटनेवरील वर्चस्वावासाठी लढाई सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर हे चव्हाट्यावर आले होते. माजी आमदार चरण वाघमारे हे आपला गट घेऊन काँग्रेसला मिळाले. पक्षाने परिणय फुके यांना भंडारा जिल्हा संघटनेवर लादलण्याची भावना आहे. आता बाळा काशिवार यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.
भंडारा जिल्हा भाजपा संघटनेची आजची परिस्थिती बघता संघटनात्मक कार्य करण्यास मानसिकदृष्ट्या असमर्थ असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यातून त्यांनी जिल्हा संघटनेतील अंतर्गंत गटबाजीवर नेमके बोट ठेवले आहे. त्यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्यत्वतेच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सैद्धातिंक विचारांना नेहमी बांधील राहीन, असे काशीवार यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.