महाविकास आघाडीला झटका:नवाब मलिक, अनिल देशमुखांचा मतदानाचा अर्ज कोर्टाने फेटाळला

0
32

मुंबई,दि.09ः राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आज मोठा झटका बसला. अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी-आजी मंत्र्यांचा मतदानाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी एका दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा, असा अर्ज दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केला होता. या निकालाविरोधात हे दोन्ही नेते आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

ईडीचा विरोध
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मतदानासाठी एका दिवसाचा जामीन देण्यास ईडीने ​​​​​विरोध केला. ईडीने 1951 कलम 62(5) या कायद्याचा हवाला दिला. कायद्यानुसार, एखादा व्यक्ती तुरुंगामध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. या कायद्यान्वये कैद्यांना मतदान करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका ईडीने विशेष न्यायालयापुढे मांडली.

अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून, ते गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तुरुंगात होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याचे ईडीने सांगितले. नवाब मलिकदेखील अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपांमुळे कोठडीत असल्याने या दोन्ही नेत्यांना मतदानासाठी बाहेर जाता येणार नाही, अशी भूमिका ईडीने मांडली. न्यायालयाने ती मान्य करत दोन्ही नेत्यांचे अर्ज आज फेटाळून लावले.

भाजपने कंबर कसली
राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारास 4 हजार 200 मते आवश्यक आहेत. पण, सध्या 500 मतांचे मूल्य असलेल्या 5 लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयीच अनिश्चितता असल्याने भाजप आणि मविआ या दोन्ही बाजूकडे चिंता आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना 10 जून रोजी राज्यसभेच्या मतदानासाठी एअर लिफ्ट करून मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे.

शरद पवार मैदानात
शरद पवार यांनी बुधवारी लखनऊ ते विरार अशी फोनाफोनी केली. त्यानंतर समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राचे समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना फोन करून आघाडीला पाठिंबा देण्याची सूचना केली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची आघाडीच्या शिष्टमंडळाने बुधवारी विरार येथे भेट घेतली. तसेच शरद पवार यांनीदेखील ठाकूर यांना फोन केला. बविआचे विधानसभेत 2 आमदार आहेत. मात्र, आज मलिक आणि देशमुख यांच्याबाबत पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मविआला झटका बसला आहे. निवडणुकीत ही दोन्ही मते मिळवण्यासाठी मविआकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. पीएमएलए न्यायालयाच्या निकालाविरोधात मविआचे दोन्ही नेते उच्च न्यायालयात जाणार असले तरी उद्याच मतदान असल्याने मविआसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.