विधान परिषद निवडणूक:शिवसेना – भाजपचे ‘हॉटेल पॉलिटिक्स’, सर्व आमदारांना 18 जूनपासून मुंबईत येण्याचे आदेश

0
51

मुंबई-विधान परिषदेतील दगा फटका टाळण्यासाठी शिवसेना-भाजपचे आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहे. 18 जूनपासून मुंबईत मुक्कामाला दाखल व्हा, असे आदेश शिवसेना आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, तर भाजपने देखील तोच कित्ता गिरवला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जूनला मतदान होणार असून, यामध्ये गुप्त मतदान ही प्रक्रिया असते. त्यामुळे दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेने खबरदारी घेतली आहे. आमदारांना 18 जूनपासून मुंबईत दाखल होण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आले आहे. पवई येथील हॉटेल रिलेसन्स येथे या आमदारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर 19 तारखेला शिवसेनेची एक बैठक होणार असून, त्यात मतदानाची माहिती दिली जाणार आहे.

भाजपची ताजमध्ये व्यवस्था

भाजपने देखील आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असून, त्यांची व्यवस्था हॉटेल ताजमध्ये करण्यात आली आहे. भाजपने वेगवेगळे गट तयार केले आहे. त्यानुसार प्रत्येक गट प्रमुखांनी आपआपल्या आमदारांना फोन करून मुंबईत येत्या 18 तारखेला 10 ते 11 वाजेपर्यंत येण्याचे सांगण्यात आले आहे. 19 जूनला भाजपची देखील महत्वाची बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप देखील झाले. त्यामुळे आता दगा फटका होऊ नये म्हणून दोन्ही पक्ष दक्ष झाले आहेत.