UPAचे 32 आमदार रांचीवरून रायपूरला एअरलिफ्ट:2 दिवसांसाठी रिसॉर्ट बुक

0
84

झारखंडमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर यूपीएच्या आमदारांना एअरलिफ्टत करण्यात आले आहे. काँग्रेस-जेएमएम आणि आरजेडीच्या 32 आमदारांना रांचीहून रायपूरला विमानाने नेण्यात आले आहे. सीएम हाऊसपासून 2 बसमधून सर्वजण रांची विमानतळावर पोहोचले होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वतः आमदारांसह बसमध्ये दिसले. येथून सर्वजण इंडिगोच्या विमानाने रायपूरला रवाना झाले. तेथे दोन दिवसांची रिसॉर्टमध्ये बुकिंग केली आहे.

आमदारांना रायपूरला पाठवल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानी रवाना झाले. विमानतळाबाहेर मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे हे पहिले सांगा. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही किंवा नवीन प्रथा नाही. सत्ताधारी पक्ष कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. रणनीतीनुसार कृती केल्या जातात. त्याच रणनीतीचे हे छोटेसे काम तुम्ही पाहिले. कारस्थान करणाऱ्यांना उत्तर देण्यास सरकार तयार आहे.

दोन दिवसांच्या राजकीय शांततेनंतर आज दुपारी 12.30 वाजल्यापासून यूपीएचे आमदार आणि मंत्री सामानासह सीएम हाऊसमध्ये पोहोचू लागले होते. तीन वाजण्याच्या सुमारास आमदारांचे सामान घेऊन तीन वाहने मुख्यमंत्री भवनातून बाहेर पडली. यादरम्यान सीएम हाऊस ते विमानतळापर्यंत घडामोडी तीव्र होत्या. रांची विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले होते.

दुसरीकडे रायपूर विमानतळावरही आमदारांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. आमदारांना विमानतळावरून बसमधून नवा रायपूर येथील मेफेअर रिसॉर्टमध्ये नेले जाईल. सायंकाळी 5.30 पर्यंत आमदार रायपूरला पोहोचल्याचे वृत्त आहे. रिसॉर्टमध्ये 30-31 ऑगस्टसाठी बुकिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

32 आमदार रायपूरला शिफ्ट
झारखंडमधील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात यूपीएच्या ३२ आमदारांना एअरलिफ्ट केले जात आहे. यामध्ये काँग्रेसचे 12, झामुमोचे 19 आणि आरजेडीच्या 1 आमदारांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि संतोष पांडे रायपूरला जाणार आहेत.

याच विमानाने रांचीहून रायपूरला जातील आमदार.
याच विमानाने रांचीहून रायपूरला जातील आमदार.

सीएम हाऊसवर पोहोचलेले आरोग्य बन्ना गुप्ता म्हणाले की, सरकार पाडण्याचा कट रचला जात आहे. भाजप काळा अध्याय लिहिण्याचे पातक करत आहे. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. आम्ही अत्यंत मजबूत व एकजूट आहोत.

रायपूरच्या मेफेअर लेक रिसॉर्टमध्ये आमदारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रायपूरच्या मेफेअर लेक रिसॉर्टमध्ये आमदारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोरेन यांनी 1 तारखेला बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

दुसरीकडे, वाढत्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यानी 1 सप्टेबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्यात जनहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आज विधानसभेच्या अध्यक्षांकडून भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांच्या आमदारकीसंबंधी निर्णय येण्याचीही शक्यता आहे.

सीएमपदाच्या शर्यतीत सोरेन यांच्या पत्नीचे नाव

या राजकीय संघर्षात हेमंत सोरेन यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची दाट शक्यता आहे. असे झाले तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय जोबा मांझी व चंपई सोरेन यांचेही नाव चर्चेत आहे. हे दोघेही सोरेन कुटुंबीयांचे निकटवर्तीय व विश्वस्त आहेत. काँग्रेसने या नावांवर अद्याप कोणतीही हरकत नोंदवली नाही.