Home राजकीय मंत्री राठोडांनी भेटीसाठी चार तास ताटकळत ठेवलेले, महंत सुनील महाराज शिवसेनेत!

मंत्री राठोडांनी भेटीसाठी चार तास ताटकळत ठेवलेले, महंत सुनील महाराज शिवसेनेत!

0

यवतमाळ,दि.01ः- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महंतांनी शिवबंधन बांधून घेतले. बंजारा समाज आणि महंत सुनील महाराज यांच्या पाठबळावर निवडून आलेल्या संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर महंत त्यांना मुंबईला भेटायला गेले होते. तेव्हा राठोड यांनी महंतांना ४ तास बसवून ठेवत चर्चाही केली नव्हती. त्यामुळे महंतांनी त्याच वेळी शिवबंधन बांधून घेण्याचे संकेत दिले होते.

बंजारा समाजाच्या चार महंतांपैकी एक असलेले सुनील महाराज यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्यांचा शिवसेना प्रवेश बंजारा समाजाच्या निर्विवाद पाठबळावर आतापर्यंत सलग चार वेळा दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेसोबतच बंजारा समाज राठोड यांच्यामागे होता. त्याच ताकदीवर सलग तीन वेळा राठोड यांना मंत्रिपदही मिळाले. मध्यंतरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतरही बंजारा समाज त्यांच्या मागे ठाम होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राठोड यांचे गेलेले मंत्रिपद परत द्यावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्या वेळी उपस्थित असलेले आणि राठोडांच्या मंत्रिपदासाठी आग्रही असलेले सुनील महाराज आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. बंजारा समाजाचे एक महंत शिवसेनेत गेल्याने राठोड यांच्यासाठी अडचणी वाढल्या आहेत.

शिवसेनेची बंडखोरांना घेरण्याची व्यूहरचना : शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या आमदार-खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी शिवसेनेकडून व्ह्यूवरचना आखण्यात येत आहे. त्यात संजय राठोड यांच्यामागे असलेला बंजारा समाजाचा पाठिंबा कमी करून त्यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशानंतर होणार आहे. दारव्हा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजामध्ये त्यांचे स्वत:चे मोठे वलय आहे. असे असले तरी सुनील महाराज बंजारा समाजाचे महंत असल्याने त्यांचा समाजामध्ये मोठा प्रभाव आहे. त्यांनी संपूर्ण समाज शिवसेनेसोबतच जोडलेला राहील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

बंजारा समाजात गद्दारी नाही बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेने महंत सुनील महाराज शिवसेनेत आले आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी माझी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी प्रवेशावेळी सांगितले. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. तेव्हा पोहरादेवीलाही मी जरूर जाईन, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनाच समाजाला न्याय देईल आज पोहरादेवी येथे बंजारा समाजाची यात्रा आहे. त्या मुहूर्तावर मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलो. मी मागेच म्हणालो होतो की नवरात्रीत मोठा निर्णय होणार आहे. त्यानुसार आज चर्चा झाली. दीड ते दोन कोटी बंजारा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवसेना न्याय देऊ शकते. त्यामुळे आम्ही ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले.

शिवसेवा संकल्प दौरा काढणार आम्ही संजय राठोड सोबत होतो. आता उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत आहोत. त्यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. तेव्हा संपूर्ण राज्यात बंजारा समाजातर्फे शिवसेवा संकल्प दौरा काढला जाणार असल्याची माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version