Home राजकीय राज ठाकरेंना मोठा धक्का; सात जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे

राज ठाकरेंना मोठा धक्का; सात जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे

0

पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकरणात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला दावा आणि कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात मनसेत (MNS) मोठी फूट पडली आहे.

महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेत्यांपर्यंत सर्वच नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आमदार रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी भाजपचे नेते जोमाने प्रचार यात्रेत उतरले आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. यातच मनसेच्या सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. यामुळे ५० जणांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणताही उमेदवार न देता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील ४० ते ५० जणांनी राजीनामे दिले. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर कसब्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारफेरीमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरती नजर ठेवून असलेल्या काही व्यक्तींनी राज ठाकरेंना माहिती पुरविली आणि रवींद्र खेडेकर आणि प्रकाश ढमढेरे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केले.

Exit mobile version