‘रेड कार्पेट’वर ‘रॅम्प वॉक’ करतांना ‘या’ नेत्याच्या पत्नीवर कौतुकाचा ‘वर्षा’व !

0
6

गोंदिया-भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ‘ग्लॅमरस’ क्षेत्रात सतत चर्चेत असतात. त्यांच्यापाठोपाठ आता राजकीय क्षेत्रात चांगलेच वजन असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नीने ‘रेड कार्पेट’वर ‘रॅम्प वॉक’ करीत कौतुकाचा ‘वर्षा’व मिळविला आहे.

गोंदियात एका शोरूमच्या संचालिका मनीषा अग्रवाल होरा यांनी येणाऱ्या दिवाळीचे औचित्य साधत गोंदियाच्या अग्रसेन भवनात फॅशन शोचे आयोजन केले होते. या फॅशन शोमध्ये पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांतून महिला व युवतींनी सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाबेन पटेल यांना या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं.

आयोजकांद्वारे तयार केलेल्या वेगवेगळ्या डिझाइन कपड्यांचे उपस्थित महिला तरुणींनी ‘रॅम्प वॉक’ करीत प्रदर्शन केले. फॅशन शोदरम्यान वर्षाबेन पटेल यांनादेखील ‘रेडकार्पेट’वर चालण्याच्या मोह आवरता आला नाही. पारंपरिक साडी लूकवर त्यांनीदेखील ‘रॅम्प वॉक’ करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. आता त्यांच्या ‘रॅम्प वॉक’ची चर्चा महिलांमध्ये चांगलीच रंगत आहे. ‘ग्लॅमर’च्या क्षेत्रात विदर्भातील नेत्यांपैकी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आघाडीवर आहेत. आता त्यात वर्षाबेन पटेल यांचे नाव जोडले गेले आहे.