नागपूर – निवडणुकीपूर्वीच आमदारांनी या वर्षाचा निधी खर्च केल्याने आता नव्या आमदारांपुढे विधानसभा मतदारसंघांत विकासकामे करण्याबाबत पेच निर्माण झाला होता. मात्र, आमदारांना मार्चपर्यंत कामे करण्यासाठी 50 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सूचित केले. सर्वच आमदारांना हा निधी दिला जाणार असल्याने जुन्या आमदारांसाठी हा बोनस ठरणार आहे.
सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वच मतदारसंघांतील आमदारांनी 2014-15 या वर्षाचा आमदार निधी खर्च केला. निवडणुकीनंतर आता निधी नसल्याने काय करायचे, असा प्रश्न या आमदारांना पडला होता. विशेष म्हणजे, 130 नव्या आमदारांना विधानसभा मतदारसंघांतील नागरिकांना दिलेले विकासकामांचे आश्वासन कसे पूर्ण करायचे याबाबत चिंता होती. नवीन अर्थसंकल्प येण्यास अद्याप चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर नव्या तरतुदीनुसार आमदारांना निधी मिळेल. चार महिन्यांपर्यंत मतदारसंघातील नागरिकांना कसे भेटणार, असा प्रश्न आमदारांपुढे उभा ठाकला होता. जुन्या आमदारांना मतदारसंघांतच निधी खर्च केल्याचा हिशेब देण्यास वाव आहे. आता नव्या आमदारांना राज्य शासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 288 आमदारांना मतदारसंघांत विकासकामांसाठी प्रत्येकी 50 लाख देण्याचे सूतोवाच अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “सकाळ‘सोबत बोलताना केले. नव्या आमदारांना याचा लाभ मतदारसंघांत कामासाठी होणार आहे. जुन्या आमदारांनी या वर्षाचा निधी विकासकामांवर खर्च केला. आता त्यांना पुन्हा 50 लाख मिळणार असल्याने त्यांच्यासाठी हा बोनस ठरणार आहे.