‘वडेट्टीवार’ समर्थक कोडवते दाम्पत्याचा भाजप प्रवेश

0
5

गडचिरोली:- प्रदेश काँग्रेसचे चिटणीसडॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी महिला काँग्रेस कमिटीच्या (congress committee)प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते यांनी आज मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. कोडवते दांपत्य हे राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

ना. विजय बडेट्टीवार यांचे होते कट्टर समर्थक

गडचिरोली -चिमूर या लोकसभा क्षेत्रासाठी डॉ.नितीन कोडवते पूर्वीपासूनच इच्छुक होते. यापूर्वी त्यांच्या पत्नी डॉ. चंदा कोडवते यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता तसेच महाविकास आघाडीत गडचिरोली- चिमूर हे लोकसभा क्षेत्र काँग्रेसच्या वाट्याला आहे. दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक(congress central election) समितीच्या बैठकीमध्ये गडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्रातून डॉ. नामदेव किरसान यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

या लोकसभा क्षेत्रातून दुसरे दावेदार म्हणून डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नावावर देखील चर्चा झाली होती. मात्र काँग्रेस हायकमांडने डॉ. उसेंडी यांना लोकसभेएवजी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. काँग्रेसकडून आपल्याला लोकसभा व पुढील विधानसभेची देखील उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येतात डॉ. कोडवते दाम्पत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्यावर पडला असल्याने आपण भाजपत प्रवेश करत असल्याचे डॉ.कोडवते यांनी भाजपात प्रवेश घेताना सांगितले.