दिल्लीचे पडसाद मुंबईत;भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं;पोलिसांकडून लाठीचार्ज

0
46

मुंबई :-काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी थेट काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर हल्लाबोल केला. मुंबईतील किल्लाकोर्ट परिसरातील काँग्रेस कार्यालयात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते चालून गेले आणि तिथे मोठा गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाईफेक केली, दगडफेक करत तोडफोडही केली. त्यामुळे तिथे काँग्रेस आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.

गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र काहीच वेळात या मोर्चाने आक्रमक रुप धारण केलं आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी किल्ला कोर्ट परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर लागलेल्या राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक केली. तसेच, राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोडही केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या खिडक्यांची काच फोडली, पोस्टर फाडले. यावेळी दगडफेकही करण्यात आली. तसेच, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिस लाठीचार्ज करताना दिसले. तसेच, काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.