चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करावे, अशी स्तुतीसुमने काँग्रेस नेते व माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उधळली.स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत ते होते.यावेळी वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला येणे हा फडणवीस यांचा मनाचा मोठेपणा आहे.
#LIVE : लोकनेते, कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती कार्यक्रम… https://t.co/HANIyFtfRz
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 10, 2025
फडणवीस यांनी मोदींचे वारसदार व्हावे, दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी माझे अनुमोदन आहे. राजकारणात ज्युनिअर कडून सिनिअरने शिकण्यासारखे आहे. मराठी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे म्हणून मा.सा.कन्नमवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला होता.
राज्यात पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा मान कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांना मिळाला होता. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलाला मंजुरी देण्याचे काम कन्नमवार यांनी केले होते. फडणवीस यांनी राजकीय बारकावे मुल, मारोडा येथे घेतले. चंद्रपूर जिल्ह्याला आता कोणीच वाली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला दत्तक घेतले पाहिजे. फडणवीस देशाचे नेतृत्व करणार आहेत. तेव्हा त्यांनी जिल्ह्यातील एका “वारा” व्यक्तीला सोबत ठेवावे असेही वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांचे नाव द्यावे, असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली तसेच चंद्रपूर आणि विदर्भात शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी काम करत आपल्या जीवनामध्ये अनेक मानके तयार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यासोबतची आपली नाळ अधोरेखित करत या जिल्ह्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करणार असे आश्वस्त केले. यासोबतच लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करणारा ग्रंथ राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून निर्माण करणार असेही श्री. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह माजी मंत्री शोभाताई फडणवीस व इतर मान्यवर उपस्थित होते.