गोंदिया पं.स.च्या सभापती पदासाठी मुनेश्वर रहांगडाले,अजाबराव रिनाईत स्पर्धेत

0
645

भाजपची पंचायत समितीवर स्थापित होणार एकहाती सत्ता !

गोंदिया,दि.१६ : स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा अडिच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला. त्यातच राज्य विधानसभा निवडणुका पार पडत सत्ता स्थापन झाली. आता पुढील अडिच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या २० जानेवारी रोजी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडणार आहे. गोंदिया पंचायत समितीचा विचार केल्यास यापुर्वी चाबी संघटन व राष्ट्रवादीच्या सहकार्याने पंचायत समितीवर सत्ता काबिज केली होती. त्यातच चाबी संघटना भाजपमय झाल्याने पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच यामध्ये विद्यमान पं.स.सभापती मुनेश्वर रहांगडाले, निष्ठावंत कार्यकर्ता अजाबराव रिनाईत, या तिघांपैकी एकाची सभापतीपदी वर्णी लागू शकते.
अडिच वर्षापुर्वी पंचायत समितीमध्ये आमदार विनोद अग्रवाल यांच्या गटाचे १० सदस्य निवडूण आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, भाजपचे १०, २ अपक्ष व १ बसपा, अशी सदस्य संख्या होती. आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेला राष्ट्रवादीने पाठिंबा देत सत्तेत सहभाग नोंदविला. यावेळी सभापतीपदी चाबी संघटनेचे मुनेश्वर रहांगडाले तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे निरज उपवंशी यांची वर्णी लागली. मात्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय उलथापालथ झाली. आमदार विनोद अग्रवाल हे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसह भाजपवासी झाले. निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर भाजप आता एकसंघ झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. सद्याची ही परिस्थिती बघता, एकंदरीत भाजपचे २० सदस्य होतात त्यामुळे दुसर्‍या कुणाचाही आधार न घेता एकहाती सत्ता पंचायत समितीवर स्थापित करण्यासाठी भाजपाचा दावा मजबूत आहे. हा दाबा मजबूत असला तरी, सभापतीपदी आपली वर्णी लागावा, यासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने विद्यमान सभापती मुनेश्वर रहांगडाले हे पुन्हा सभापती होण्याची इच्छुक आहेत. मात्र या पुर्वीचा विचार केल्यास भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचाही या पदासाठी विचार होण्याची शक्यता असून, यात एकोडी क्षेत्राचे पं.स.सदस्य अजाबराव रिनाईत यांचे नाव अग्रस्थानी आहे.त्यामुळे पक्ष श्रेष्ठी कुणाच्या नावावर शिक्का मोर्तब करणार,याकडे लक्ष लागले आहे.
इच्छुकांची पार्श्वभूमि
मुनेश्वर रहांगडाले – अदासी पंचायत समिती क्षेत्राचे नेतृत्व करतात. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे कुटुंब भाजपचे निष्ठावान राहिले. मात्र सन २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी विनोद अग्रवाल यांच्यासोबत जाने पसंत केले. त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांनी देखील त्यांना सभापती पदाची जबाबदारी सोपविली. त्यांचे कामे लक्षात घेत पुन्हा जबाबदारी देण्याबाबत विचार केला जात आहे.
…….
अजाबराव रिनाईत- रिनाईत हे एकोडी पंचायत समिती क्षेत्राचे प्रतिनिधीत्व तकरीत आहेत. दोनदा ग्रामपंचायत सदस्य तसेच सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. तर दुसरीकडे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी बुथ पदाधिकारीपासून मंडळ, तालुका व जिल्हा कार्यकारिणीमध्ये सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे. परिणामी त्यांचा नावाचाही विचार या पदासाठी होण्याची दाट शक्यता आहे.