Home Top News शिवणकर-बोपचेंनी आता ओबीसींच्या हितासाठी लढावे

शिवणकर-बोपचेंनी आता ओबीसींच्या हितासाठी लढावे

0

गोंदिया- पूर्व विदर्भाच्या राजकारणावर भारतीय जनता पक्षात मातब्बर नेते माजी खासदार तथा माजी वित्तमंत्री प्रा.महादेवराव शिवणकर व माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांची आजही छाप आहे. अद्यापही ते भाजपवासीच आहेत. परंतु, भाजपने त्यांना अलीकडे अडगळीत टाकले आहे. यामुळे त्यांनी या संधीचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी करावा, असा एक मतप्रवाह ओबीसी समाजात सुरू झाला आहे. अडगळीत शांत बसून न राहता या दोन्ही नेत्यांनी ओबीसी समाजाला संघटित करून समाज जागृतीच्या लढ्यात उतरायला पाहिजे.
आज देशाच्या संसदेत ओबीसींचा आवाज बुलंद करणारा एक सच्चा मागासवर्गींयाचा नेता असलेले गोपीनाथराव मुंडे यांना हिरावून घेतले आहे. त्यामुळे पक्षात राहून आपल्या समाजासाठी संघर्ष करण्याची भूमिका या दोन्ही नेत्यांनी स्वीकारली तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालावर त्याचा चांगला परिणाम पडू शकतो, अशा चर्चांनी वेग घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून रंगलेल्या राजकीय वादानंतर आता सर्वच नेते आपापल्या कामाला लागले आहेत. तिरोड्यातून इच्छुक असलेले विद्यमान आमदार खुशाल बोपचे आणि पंचम बिसेन यांना उद्देशपूर्णरीत्या डावलण्यात आले. गोंदियासह तिरोड्यातून इच्छुक असलेल्या माजी आमदार हेमंत पटले यांच्याही तोंड बंद करण्यात आले. उमेदवारी वा तिकीट वाटप करताना नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खबरदारी घेतली. प्रा.महादेवराव शिवणकर आणि खुशाल बोपचे असो की विद्यमान खासदार नाना पटोले यांच्या समर्थकांची कुठेही वर्णी लागू दिली नाही. जे काही उमेदवार दिले ते सर्व या नेत्यांपासून दूर झालेले गणले जातात.
नाना पटोलेंनी तर आधी ओबीसी छावा संग्राम संघटना चालवून काँग्रेसला हादरवून सोडले होते. परंतु, आज त्यांची अवस्था काही बरी नाही. त्यांनी कष्टाने उभी केलेली ओबीसी संग्रामही बेपत्ता झाली. गोंदियातून इच्छुक ओबीसी संग्रामचे राजेश चतुर यांच्यावरही अपक्ष अर्ज सादर करण्याची वेळ आली होती. या सर्व गोष्टीवर नजर टाकल्यास कुठेतरी ओबीसी समाजालाच नव्हे तर त्यांनी उभ्या केलेल्या चळवळीचा खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ओबीसींना दाबण्यासाठी पुढाकार घेणाèयांना संधी दिल्या जात आहेत. याचा विचार व्हायला हवा.
निव्वळ आपल्यावर अन्याय झाल्यानंतरच बोलायचे ही भूमिका सोडण्याची वेळ भंडारा गोंदिया जिल्ह्यातील आजी माजी खासदारांवर आली आहे. म्हणून त्यांनी संघटित होऊन आपली भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी एकत्र येऊन ओबीसी समाजाची धुरा आपल्या हातात स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version