Home Top News प्रचाराच्या तोफा थंडावल्या

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

0

गोंदिया – राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या असून २८८ मतदारसंघांत बुधवारी मतदान होणार आहे. राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांसह ४११९ उमेदवार रिंगणात आहेत.
यंदा प्रथमच पंचरंगी लढती होत असून उमेदवारांनी अखेरच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह कोकणात सभा, रॅली, रोड शो, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारसंघ पिंजून काढला. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान नि:पक्षपाती व खुल्या वातावरणात होण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला आहे. सोमवारचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष जीवाचे रान करत होते.
राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभांसह रोड शो, पदयात्रांनी मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यात आला. जाहीर प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचारावरच सर्वाचा भर असणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यात २८८ मतदारसंघ असून त्यापैकी २३४ मतदारसंघ हे खुल्या प्रवर्गासाठी, २९ मतदारसंघ हे अनुसूचित जाती तर २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. २८८ जागांसाठी ४११९ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ३८४३ उमेदवार पुरूष तर २७६ महिला उमेदवार आहेत.
अकोला आणि गुहागर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार रिंगणात आहेत तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वात जास्त ३९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे सर्वात जास्त २८७, शिवसेनेचे २८२, भाजपचे २८०, राष्ट्रवादीचे २७८ आणि मनसेचे २१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ४ लाख ८४ हजार मतदार तर वडाळा हा सर्वात लहान मतदारसंघ असून त्यात १ लाख ९६ हजार मतदार आहेत.
दीड लाख मतदान यंत्रे
या निवडणुकीसाठी १ लाख ५१ हजार मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील ८ कोटी ३५ लाख ३८ हजार १४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२३३१ मतदान केंद्रे संवेदनशील
मतदान मुक्त व निपक्षपाती होण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ३२० कंपन्या, १ लाख २२ हजार पोलिस मतदानाच्या दिवशी तैनात केले आहेत. राज्यात २३३१ मतदान केंद्र ही संवेदनशील तर ६२६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित केली आहेत. गडचिरोलीत सर्वात जास्त ४५० मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. मुंबईत ३४१, ठाणे ३९९, रायगड १९ आणि रत्नागिरी १ मतदान केंद्र संवेदनशील आहे.

Exit mobile version