जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

0
21

वाशिम, दि. 24  : वाशिम जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांच्या हस्ते आज 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, दिगंबर लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. खारोले व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रीडा स्पर्धेच्या प्रारंभी श्रीमती पंत यांनी दिप प्रज्वल केले. त्यानंतर क्रीडा मशाल प्रज्वलीत करुन क्रीडा ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थितांना श्री. मापारी यांनी क्रीडा शपथ दिली. 24 ते 26 नोव्हेंबर या तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद मुख्यालयासह सर्व पंचायत समित्यांचे एक हजार खेळाडू सहभागी होणार आहे.

श्रीमती पंत यांनी उदघाटन प्रसंगी सर्व खेळाडूंना सांघिक भावनेने आणि स्पर्धेच्या जिद्दीने सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांचे प्रदर्शन घडवावे असे आवाहन केले.

100 मिटर धावण्याच्या स्पर्धेपासून क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाला अतिरिक्त कृषी विकास अधिकारी श्री. गिरी, उपमुख्य लेखाधिकारी श्री. मोरे यांचेसह पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्री. तांगडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव व शिक्षक डिगांबर घोडके यांनी मानले.