‘ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशेनियन चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धांचे मुंबईत आयोजन

0
5

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी ‘2022 ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप’चे 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत गिरगाव चौपाटी येथे आयोजन केले आहे. तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या या स्पर्धांचा थरार मुंबईसह भारतवासियांना अनुभवता येणार आहे.

मुंबईला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, 13 डिसेंबर रोजी स्पर्धकांची नोंदणी करण्यात येणार आहे. तर, 14 डिसेंबर  रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 19 डिसेंबरपर्यंत 10 शर्यतींमध्ये प्रतिदिन जास्तीत जास्त तीन फ्लीट  शर्यती आयोजित केल्या जातील. या चॅम्पियनशीपचा समारोप 19 डिसेंबर रोजी ठाकर्स, चौपाटी येथे होईल.

महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा क्रीडा विभाग, याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया (YAI) आणि नॅशनल ऑप्टिमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (NOAI) यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा आशियाई आणि आशियाई महासागरातील सदस्य राष्ट्रांसाठी कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप आहे. आशियाई आणि ओशनिया प्रदेशातील 13 देशांतील 105 स्पर्धक या आठवडाभर चालणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. अर्जेंटिना, थायलंड, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, तुर्की, जपान, कॅनडा आणि भारतातील सुमारे 25 अधिकारी आंतरराष्ट्रीय ज्युरी/रेस मॅनेजमेंटमध्ये सहभागी असणार आहेत.

युवकांची ऊर्जा क्रीडा क्षेत्रासाठी उपयोगात यावी, चारित्र्यनिर्मिती, त्यांच्यात साहसाची भावना जागृत करणे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम करणे जेणेकरून राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान लाभेल, हे या खेळाचे उद्दिष्ट असल्याचे कमाडिंग ऑफिसर कर्नल नछतर सिंग जोहल यांनी सांगितले. मुंबईकरांनी या आशियाई नौकानयन स्पर्धांचा थरार अनुभवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे