जामनेर येथे नवीन क्रीडा संकुलास मान्यता; लवकरच निघणार शासन निर्णय – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

0
9

मुंबई, दि. 4 : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील सर्व सुविधायुक्त आणि अद्ययावत  नवीन तालुका क्रीडा संकुलास मान्यता देण्यात आली असून लवकरच शासन निर्णय निघणार आहे. जळगाव जिल्हा क्रीडा संकुलास अतिरिक्त निधी देण्यात येणार असून यामध्ये आधुनिकीकरणासह सिंथेटिक मॅट बांधण्यात येणार असल्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

मंत्रालयात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे, उप सचिव सुनील हांजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पारोळा, एरंडोल या तालुका क्रीडा संकुलास निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जामनेर येथे बांधण्यात येणारे क्रीडा संकुल हे स्थानिक खेळाडूंच्या सरावासाठी आणि क्रीडा स्पर्धांकरीता सर्व क्रीडा साहित्यासह अद्ययावत बांधण्यात येणार आहे. मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी याठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे सुलभ होण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमधील पदकामध्ये वाढ होण्यासाठी ठराविक खेळावर लक्ष केंद्रित करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील विविध खेळ आणि खेळाडू यांचा अभ्यास करुन ज्या भागात संबंधित क्रीडा प्रकाराच्या खेळाडूंची संख्या जास्त आहे त्या भागात त्या खेळाच्या सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्यात. क्रीडा क्षेत्राचा नवीन आराखडा बनवण्यात येणार आहे, असेही श्री. महाजन म्हणाले तसेच मंत्री श्री. महाजन यांनी राज्यातील सर्व क्रीडा संकुलांचा यावेळी आढावा घेतला.

एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब जर्मनी यांच्याशी झालेल्या काराराच्या अनुषंगाने होणाऱ्या स्पर्धेकरिता 1.30 कोटी निधी मंजूर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जर्मनीच्या एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब यांच्यातील करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मनी येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या “एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप  फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एफ.सी. बायर्न फुटबॉल क्लब जर्मनी यांच्याशी झालेल्या कराराच्या अनुषंगाने होणाऱ्या स्पर्धेकरिता राज्य शासनाकडून 1.30 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करून, त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.महाजन यावेळी केले.