मुंबई, दि. ३० ऑगस्ट: मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित ५६ व्या आंतरमहाविद्यालयीन/ संस्थात्मक/ विभागीय सांस्कृतिक युवा महोत्सव अंतिम फेरीचे उद्घाटन मंगळवार २९ ऑगस्ट २०२३ रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड, अभिनेते ओंकार भोजने, तालवादक विजय जाधव, ललित कलाकार डॉ. बालाजी भांगे, चित्रपट व मालिका लेखक चेतन सैन्दाणे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक निलेश सावे यांच्यासह कला-नाट्य यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या उद्धाटन सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन, अथक प्रयत्न आणि भरपूर सराव करण्याचा मोलाचा सल्ला पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर यांनी दिला. कलेच्या क्षेत्रात असलेली आवड जोपासण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात खूप सराव केला असल्याचे त्यांनी सांगितले. परिंदा चित्रपटातील “तुमसे मिलके ऐसा लगा…” या गीत गायनांने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सांस्कृतिक युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे दर्शन घडविणारे, त्यांच्यातील उर्जा आणि सादरीकरणासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे. अशा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना त्यांचातील कला-गुणांचा अविष्कार करण्याची संधी मिळत असते. कोणत्याही क्षेत्रात वावरताना सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन मार्गक्रमण करावे. त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांचे अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे अवलोकन करावे, विविध टप्प्यांवरील यशापयशाचे धडे घेऊन बोध घेण्याचा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला. विद्यार्थी विकास विभागाने या स्पर्धांच्या प्राथमिक फेऱ्यांचे उत्तम आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व संयोजक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुंबई विद्यापीठामार्फत दरवर्षी सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या सांस्कृतिक युवा महोत्सवाचे हे ५६ वे वर्ष आहे. या सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सात जिल्ह्यातील विविध बारा परिक्षेत्रात दिनांक १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२३ या दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळपास ३४२ हून अधिक महाविद्यालयांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, वांड्मय आणि ललीत कला या एकूण पाच कला प्रकारातील विविध ४१ स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. प्राथमिक फेरीतील विजेत्यांचे अंतिम फेरीसाठी झालेल्या निवडीचे सादरीकरण हे ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. यामधून जे विजेते होतील त्यांची निवड चाचणी करून संघ तयार करून पुढे तो संघ राज्यस्तरीय, पश्चिम क्षेत्र आणि देश पातळीवरील आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.