केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
1 हजार 917 खेळाडू दाखविणार क्रीडा कौशल्य
नागपूर, दि. 02 : आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन, व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, 3 जानेवारीला सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन टाकळी ,नागपूर येथील मैदानावर होणार आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामात राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील 1 हजार 917 आदिवासी खेळाडू आपल्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य व नैपुण्य दाखविणार आहेत. या क्रीडा संमेलनाची भव्यता अनुभवायला मिळणार असून नवीन वर्षात क्रीडामय वातावरणात चित्तथरारक व चुरशीच्या सामन्याचा आनंद क्रीडाप्रेमींना लुटायला मिळणार आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उद्घाटन समारंभास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ, नियोजन, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार संजय मेश्राम, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे उपस्थित राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, नागपूर महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बक्षिस वितरण
राज्यातील नागपूर, नाशिक, ठाणे व अमरावती या चार विभागातील खेळाडू 3 ते 5 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरावर आपल्यातील क्रीडा गुण व प्रतिभा, कौशल्य प्रदर्शित करणार आहेत. वयवर्षे 14, 17 व 19 वयोगटातील कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक तसेच लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळात ही स्पर्धा होत आहे. या निमित्ताने राज्यातील आश्रम शाळेतील खेळाडूंना राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.
या क्रीडा संमेलनात नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ब्रायटर माईंड, मेमरी इन्हान्समेंट, बोलका वर्ग उपक्रम व मलखांब कौशल्याचे सादरीकरण केल्या जाणार आहे. राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असून आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे, आयुक्त नयना गुंडे यांच्या नियंत्रणात नागपूर विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी राज्यात झाली आहे.