Home यशोगाथा अंगणामधील रोपे निर्मितीतून गवसला आधुनिक रोपवाटिका उभारणीचा मार्ग

अंगणामधील रोपे निर्मितीतून गवसला आधुनिक रोपवाटिका उभारणीचा मार्ग

0
  • जांब येथील महिला शेतकरी सरला मोहिते यांची यशोगाथा

वाशिम जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव बहुतांश पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करतात. कोरडवाहू पध्दतीची ही शेती वरुण राजाच्या कृपादृष्टीवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती ही संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील आहे. विविध योजनांची सांगड घालून सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यात येत आहे. एकीकडे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीन व तुरीचे पिक घेत असतांना मंगरुळपीरनजीक असलेल्या जांब शिवारात शेडनेट व पॉली हाऊसच्या माध्यमातून सरला मोहिते हया सुशिक्षीत शेतकरी महिलेने नाविन्यपुर्ण साई रोपवाटिकेच्या माध्यमातून भाजीपालावर्गीय व पपई रोपांची निर्मिती करुन जिल्हयातीलच नव्हे तर शेजारच्या जिल्हयातील शेतकऱ्यांना नगदी पिकाचा मार्ग दाखविला आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून राज्य शासनाने सरला रमेश मोहिते यांना सन २०१९-२० या वर्षाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने १ जुलै २०२१ रोजी कृषि दिनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात गौरविण्यात आले आहे.

सरला मोहिते यांची शेलूबाजारजवळ असलेल्या घुगरी या गावी ५ एकर शेती. सरला मोहिते यांचे पती रमेश मोहिते हे मानोरा तालुक्यातील मानोली येथे खाजगी शाळेत शिक्षक आहेत. सरला यांना शेती करण्यासाठी त्यांच्या पतीचे प्रोत्साहन आणि पाठबळ देखील मिळाले. सरला मोहिते यांचे शिक्षण बी.ए. पदवीपर्यत झाले. पतीच्या अर्थाजनात आपलाही वाटा असला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे. रोपे निर्मिती करण्याची त्यांची आवड त्यांना एक चांगली आदर्श शेतकरी बनवेल असे त्यांना कधी वाटले नाही.

सन २००५ मध्ये मंगरूळपीर येथील वैष्णवीनगरात घरी असलेल्या खुल्या जागेत सन २००५-०६ ते सन २००८-०९ या कालावधीत पपईची रोपे तयार करून विक्री केली. रोपे विक्री व्यवसायात आपण चांगली प्रगती करू शकतो, असा विश्वास पपईच्या रोपे निर्मितीतून निर्माण झाला. त्यामुळे मंगरूळपीरच्या पश्चिम दिशेला असलेल्या जांब शिवारात सन २००९ मध्ये २ एकर पडीक जमीन विकत घेतली. या जमिनीवर चांगली मशागत करून विविध प्रकारच्या रोपे निर्मितीला सुरुवात केली. त्यानंतर तिथेच २ एकर शेती सन २०१० मध्ये खरेदी केली. सन २०१२ मध्ये पुन्हा एक एकर व सन २०१९ मध्ये एक एकर शेती घेतली. अशी एकूण ६ एकर शेती जांब शिवारात खरेदी केली.

सरला मोहिते यांनी साई रोपवाटिकेच्या माध्यमातून सन २००५ पासून रोपे तयार करण्याला सुरुवात केली. घरीच रोपे तयार केली ती पपईची. पुण्यात २००४ मध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनातून त्यांनी रोपे तयार करण्याचे १ हजार ट्रे खरेदी केले. कोकोपीट, शेणखत आणि माती मिश्रीत करुन ट्रेमध्ये १ हजार आणि पॉलीथीन पिशव्यामध्ये १५०० असे २५०० पपईचे बियाणे टाकले. परंतू त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नाही. मंगरुळपीर येथील घरी देखील त्यांनी रोपे निर्मिती केली. सन २००६ मध्ये तयार केलेली तायवान पपईची रोपे बघून ६५ हजार रुपयांची तायवान पपईची रोप तयार करण्याची त्यांना ऑर्डर मिळाली.

सरलाताईने यशस्वीपणे रोपे निर्मिती होत असल्याने त्यांनी सन २००७ पासून भाजीपाला रोपे तयार करण्याला सुरुवात केली. पपई, वांगे, मिरची, टोमॅटो, कोबी, झेंडू, टरबूज आणि खरबूज यांची रोपे त्या तयार करु लागल्या. मंगरुळपीरपासून पश्चिमेकडे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या जांब शिवारात त्यांनी ६ एकर शेती खरेदी केली. रोपवाटीकेसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून एक विहिर आणि पाच विंधन विहिरी तयार केल्या. सन २०१२ मध्ये कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजनेतून २० गुंठे जमिनीवर ७ लक्ष रुपयातून शेडनेट तयार करण्यात आले. याकरिता ३ लक्ष रुपये अनुदान मिळाले. सन २०१४ मध्ये संरक्षित शेती योजनेतून २० गुंठे जमीनीवर १६ लक्ष रुपयांचे पॉली हाऊस तयार करण्यात आले. याकरिता ८ लक्ष रुपये अनुदान मिळाले.

गादी वाफ्यावर सुध्दा शेतकऱ्यांच्या ऑर्डर प्रमाणे रोपांची निर्मिती करण्यात येते. विशेषत: मे महिन्यात शेतकरी मिरचीच्या रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. यामध्ये सिमला मिरचीच्या रोपांची मागणी जास्त असल्याचे सरीता मोहिते यांनी सांगितले. १ रुपया १० पैसे याप्रमाणे प्रती रोपांची विक्री करण्यात येते. नारळाच्या काथ्यापासून रोप निर्मितीसाठी तयार कोकोपीट, गांडुळ खत आणि माती यांचे मिश्रण करुन ट्रेमध्ये भरल्यानंतर बी टाकल्या जाते. ३० दिवसानंतर मिरची, २० दिवसानंतर टोमॅटो, फुलकोबी, पानकोबी तर ४० दिवसानंतर पपईची रोपे विक्रीसाठी तयार होतात. १०० रोपे असलेल्या एका ट्रेची १२० रुपये याप्रमाणे विक्री करण्यात येते. पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी हिंगोली व अमरावती जिल्ह्यातील रोपवाटिकेतून भाजीपालावर्गीय रोपांची खरेदी करायचे. मात्र वाहतूक करतांना रोपांना नुकसान पोहोचायचे. भाजीपालावर्गीय रोपे आणि पपईची रोपे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबतच शेजारच्या अकोला, अमरावती, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ जिल्हयातील शेतकऱ्यांना सहज साई रोपवाटीकेतून उपलब्ध होत असल्याने या शेतकऱ्यांनी भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करुन नगदी पिकाची कास धरली आहे. त्यामुळे त्यांच्या अर्थात्पादनात वाढ होत असल्याने सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.

साई रोपवाटीकेतून भाजीपाला आणि पपई रोपांची वर्षभर निर्मिती शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे करण्यात येते. १ किलो पपई बियाणे ४ लक्ष रुपयांचे, १० ग्रॅम कोबी, मिरची बियाणे ५०० रुपयांमध्ये खरेदी करण्यात येते. वर्षभरात रोपे निर्मितीसाठी मिरचीचे १०० ग्रॅमचे २०० पॉकीट, वांगे १०० पॉकीट, जवळपास वर्षभरात १ हजार ते १२०० विविध बियाण्यांचे पॉकीटे खरेदी करावे लागतात. या सर्व बियाण्यांचे पॉकीट खरेदी करण्यासाठी जवळपास २२ ते २३ लक्ष रुपये खर्च येतो. तर मातीसाठी २ लक्ष, कोकोपीट खरेदीचा खर्च ४ लक्ष रुपये येतो. रोपवाटीकेत १० महिलांना व ३ पुरुषांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासर्व मजुरांना दर आठवड्याला जवळपास ३० हजार रुपये मजूरी देण्यात येते. दर्जेदार रोप निर्मितीसाठी रोपांवर किड येवू नये म्हणून किटकनाशकांची फवारणी करण्यात येते. सर्व खर्च वजा जाता वर्षाकाठी ४ ते ५ लक्ष रुपये नफा साई रोपवाटीकेच्या माध्यमातून मिळत असल्याचे सरला मोहिते यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना भाजीपालावर्गीय पिकांसाठी साई रोपवाटीकेतून रोपे उपलब्ध होत असल्याने रोपे तयार करण्याचे कष्ट वाचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी साई रोपवाटिकेमुळे भाजीपालावर्गीय पिके घेण्यास सुरुवात केली. पूर्वी पावसाच्या पाण्यावर केवळ तूर, सोयाबीन, कापूस पिकविणारा शेतकरी उपलब्ध संरक्षित सिंचनाच्या सुविधेमुळे आणि साई रोपवाटीकेतून उपलब्ध होणाऱ्या रोपांमुळे भाजीपालावर्गीय पिकांकडे वळला आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होत असल्याचे सरला मोहिते यांनी सांगिलते.

घरी पूर्वी थोडीफार असलेल्या शेतातून आणि घरी असलेल्या मोकळ्या जागेत रोपे तयार करुन घरच्या अर्थकारणात आपलाही वाटा असला पाहिजे, या जाणीवेतून सरला मोहिते यांनी साई रोपवाटीकेतून विविध रोपांची निर्मिती करुन नवीन असा शेतीपुरक व्यवसाय सुरु करुन अनेक महिला शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

Exit mobile version