Home यशोगाथा शेळीपालन व्यवसाय बनला सुनिताचा जगण्याचा आधार

शेळीपालन व्यवसाय बनला सुनिताचा जगण्याचा आधार

0

सुनिता मिताराम परते मु.नवाटोला, ता.सालेकसा. गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला हे गाव सालेकसा तालुक्यापासून पूर्व दिशेला 6 कि.मी. अंतरावर असून पुर्णपणे जंगलाने व्यापलेले आहे. या गावात गोंड (आदिवासी) समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 2017 ला जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र पिपरिया, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) स्थापन झाले. त्याअंतर्गत बेरोजगार स्वयंसहाय्यता बचतगटाची स्थापना करण्यात आली. गटाची मासिक बचत ही 50 रुपये ठरविण्यात आली. गावात पशुसखी म्हणून शकुंतला अशोक कोडवती ताईची निवड करण्यात आली. येथील पशुपालक पुर्वीपासून परंपरागत पध्दतीने पशुपालन करीत होते. परंतू पशुसखी आल्यापासून शेळीपालना विषयी नवीन नवीन माहिती मिळू लागली.

        सुनिता मिताराम परते यांच्या कुटूंबात एकूण 4 सदस्य आहेत. अत्यंत हालाकीच्या अवस्थेत जीवन जगणे सुरु होते. कुटूंब चालविण्याकरीता अनेक प्रकारच्या अडचणी व समस्यांचा सामना करावा लागत होता. मुला-मुलींच्या शिक्षणाकरीता पैसे व्याज स्वरुपात उधार घ्यावे लागत होते. सुनिता ताईच्या पतीला दारुचे व्यसन असल्यामुळे ते कुठलेली काम करण्याकरीता जात नव्हते. सर्व कुटूंबाचा भार सुनितावर होता. कुटूंब चालविण्याकरीता अनेक प्रकारचे अडथळे समोर येत होते.

        पशुसखी शकुंतला ताईला सुनिताच्या परिस्थितीबाबत माहिती होती. पशुसखीने सुनिताला बिरसा मुंडा शेळीपालन सुक्ष्म उपजिविका आराखडा (MLP) यामध्ये समाविष्ट करुन घेतले. यावेळेपर्यंत सुनिताकडे एकही शेळी नव्हती. शकुंतला पशुसखी ताई शेळीपालना विषयी माहिती सांगत होत्या व शेळीपालन केले तर तुमच्या कुटूंबाला हातभार लागेल याचा विश्वास देत होत्या. सुनिता ताईला पशुसखीचे म्हणणे पटत होते, पण शेळ्या घेण्याकरीता भांडवलाची अडचण होती. भांडवलाच्या अडचणी बाबत सुनिता ताईने पशुसखीला सांगितले. त्यानंतर सामुदायिक संसाधन व्यक्ती (CRP) च्या माध्यमातून गटाला आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या माध्यमातून 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यामधून सुनिता ताईने 20 हजार रुपयांचे कर्ज घेतले व 15 जानेवारी 2020 रोजी 12 हजार रुपयांच्या 2 गाभण शेळ्या विकत घेतल्या.

        चांगले शेळीपालन करावयाचे असल्यास शेळ्यासाठी व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. याबाबत सुक्ष्म उपजिविका आराखडा (MLP) च्या बैठकीत माहिती मिळत असल्यामुळे शेळ्याकरीता बांबूचा खुला वाडा बनविला. दाना स्टॅन्ड व पाणी स्टॅन्ड बनविले आणि शेळ्यांना वेळे-वेळेवर लसीकरण व टिकाकरण करणे गरजेचे आहे याची जाणीव सुनिताला होती. पशुसखी ताईच्या माध्यमातून नियमितपणे लसीकरण व टिकाकरण होत असल्यामुळे शेळ्या निरोगी राहत होत्या.

       विकत घेतलेल्या शेळ्या गाभण असल्यामुळे पशुसखी ताईकडून शेळ्यांचे वजन वाढावे, चांगले पिल्ले जन्माला यावेत. पिल्ल्यांचे वजन चांगले वाढावे व त्यांच्यापासून उत्पन्न मिळावे याकरीता सुनिताने पशुसखीच्या सल्ल्याने 25 रुपये किलो ग्रॅम प्रमाणे 10 किलो ग्रॅम दाना मिश्रण खरेदी केले व 1 किलो ग्रॅम पशुचाट खरेदी केला. त्या दोन शेळ्यांना प्रत्येक दिवशी 300 ग्रॅम प्रमाणे दाना सुरु केला. दोन महिन्यानंतर दोन्ही शेळ्यांनी 2-2 पिल्ल्यांना जन्म दिला. त्यापैकी 2 नर व 2 मादा होते. आता सुनिताकडे एकूण 6 शेळ्या झाल्या. त्या पिल्ल्यांचा पशुसखीच्या मार्गदर्शनानुसार आहार व्यवस्थापन करत गेल्या. नित्य नियमाने चारा, दाना मिश्रण खाऊ घालत होत्या. वेळोवेळी लसीकरण व डी-वार्मिंग करत होत्या. दर पंधरा दिवसाला पशुसखी ताई शेळ्यांचे व बकऱ्यांचे वजन घेत होत्या. त्यानुसार आहारात काही बदल करावयाचे असल्यास त्या सुचवित होत्या.

       सुनिता ताईने हया शेळ्यांचे व बकऱ्यांचे सहा महिने सुक्ष्म उपजिविका आराखडा (MLP) च्या बैठकीत ज्याप्रकारे माहिती मिळाली त्या पध्दतीने संगोपन केल्यानंतर, सहा महिन्यानंतर दिनांक 21 सप्टेंबर 2020 ला दोन्ही नर ज्यांचे वजन 36 किलो व 35 किलो असे होते त्यांना गावातीलच एका व्यक्तीस 250 रुपये वजनाने 17 हजार 500 रुपयांना विकले व दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी एक शेळी 5 हजार 500 रुपयामध्ये विकली. हया पासून सुनिताला 23 हजार रुपये मिळाले आणि आता अगोदरच्या दोन्ही शेळ्या 4-4 महिन्याच्या गाभण आहेत. शेळी व्यवसायामध्ये नफा बघून सुनिताने आणखी एक शेळी 6 हजार 500 रुपयामध्ये खरेदी केली.

        आता सुनिताच्या घरी 4 शेळ्या आहेत, ज्यांची किंमत ही 27 हजार रुपये आहे. सुनिता ताई आज गावात सन्मानाने जीवन जगत आहे. शेळीपालन व्यवसाय हा कुटूंबाचा आधार बनल्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळचा आभार मानत आहे व नविन प्रजातीच्या शेळ्याचे संगोपन करुन कुटूंबाला अधिक समृध्द करण्याचा मानस सुनिताने घेतला आहे.

   – कैलाश गजभिये उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

error: Content is protected !!
Exit mobile version