Home यशोगाथा जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी अनोख्या प्रयोगातून निर्माण केला ‘शेती आदर्श’

जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी अनोख्या प्रयोगातून निर्माण केला ‘शेती आदर्श’

0

* पारंपरिक शेती पद्धतीला बगल
* वैविध्यपूर्ण शेतीतून आर्थिक उन्नती
* सेंद्रिय शेतीला प्राधान्य
* वेगळ्या प्रयोगाची कृषी विभागाकडून दखल

          गोंदिया, दि.२९ : धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मुख्यत्वे धान हे मुख्य पीक आहे. पारंपरिक धान शेतीसोबतच शेतकरी आता नवनवीन पीक प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवीत आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न या तत्वाचा अवलंब करून शेतकरी प्रयोगशील शेती करीत आहेत. भाजीपाला, फळबाग, सेंद्रिय शेती, मका, हळद, ऍझोला, तेलवर्गीय पिके व ठिबक सिंचन या सारखे वेगळे प्रयोग जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने करत असतात. यातून त्यांना भरघोस उत्पन्न सुद्धा मिळत आहे. स्ट्रॉबेरी सारखा अनोखा प्रयोग सुद्धा येथील शेतीत होतांना दिसत आहे. शेतीत अनोखा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सन्मानित केले आहे. आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

         गोंदिया तालुक्यातील लोधीटोला येथील रतनलाल बघेले व किंडगीपार येथील मधूलिका पटले या शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळलागवड उत्कृष्टरित्या करून भरघोस उत्पन्न घेतले आहे. या प्रयोगाला कृषी विभागाच्या योजनांची साथ लाभली. देवरी तालुक्यातील भागी येथील गोमती लोकनाथ तितराम या महिला शेतकऱ्यानी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड, पॅकहाऊस, तायवान पेरू लागवड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका या माध्यमातून आपल्या शेतीत यशस्वी प्रयोग केले. यात त्यांचे उत्पादन तर वाढलेच शिवाय आर्थिकस्तरही उंचावला. शेत कामासाठी एमायडीएच योजनेअंतर्गत त्यांनी मिनी ट्रॅक्टर सुद्धा खरेदी केला. तिरोडा तालुक्यातील सेलोटपार येथील शालिनी बांते यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका केली असून सध्या त्या रोप विक्री करत आहेत. यातून त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला आहे.

           पदमपूर ता. देवरी येथील शेतकरी किशोर कोरे यांनी ठिबकवर भाजीपाला लागवड, पॅकहाऊस, गांडूळ खत युनिट, आंबा, फणस, रक्तचंदन लागवड असे नानाविध प्रयोग आपल्या शेतात केले आहेत. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटात त्यांनी घरपोच भाजीपाला विक्री केली होती. धानाच्या पट्ट्यात मका लागवड हा अनोखा प्रयोग अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील युवराज रुखमोडे यांनी यशस्वी करून दाखविला. सोबतच मिरची लागवड, टरबूज पिकाची लागवड त्यांनी ठिबक व मल्चिंगचा वापर करून केली. विहिरगाव येथील विश्वनाथ वालदे हे  संपूर्ण शेती ठिबक व मल्चिंगचा वापर करून करतात. त्यांनी दोन्ही हंगामात भाजीपाला व मका लागवड करून भरघोस उत्पादन घेतले.

         अलीकडे सेंद्रिय उत्पादनाला मोठी मागणी आहे. रासायनिक खतांचा वापर हा पिकांसाठी योग्य नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य यांना बाजारात मोठी मागणी असते. गोंदिया जिल्ह्यातही सेंद्रिय शेतीचा प्रयोग अनेक शेतकरी करतांना दिसतात. आमगाव तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी संतोष पारधी यांनी आपल्या शेतात सेंद्रिय तांदूळ, हळद व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले आहे. सेंद्रिय तांदुळाला बाजारात मोठी मागणी असते. बाजाराची ही गरज ओळखून त्यांनी हा यशस्वी प्रयोग केला. बोरकन्हार येथील महिला शेतकरी ममता ब्राम्हणकर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन दुग्धोत्पादन उद्योजक बनल्या आहेत.

       सालेकसा तालुक्यातील प्रेमलता चौधरी यांनी सेंद्रिय शेती केली. हळद उत्पादन व विक्री, सेंद्रिय तांदूळ, कस्तुरी मेथी पॅकिंग, टमाटर लोणचे, औजारे बँक, तांदूळ व गहू पिकांचे पदार्थ, जैविक निविष्ठा निर्मिती, दशपर्णी जीवामृत तयार करणे, कंपोस्ट खत तयार करणे असे विविध शेतीपूरक उद्योग त्या करतात. सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. सलंगटोला येथील खेमराज ब्राम्हणकर यांनी सुद्धा सेंद्रिय शेती सोबतच दशपर्णी अर्क, गांडूळ खत, ऍझोला निर्मिती, सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय कडधान्य, हळद, हरबरा, तूर, लाख इत्यादी पिकांबरोबर शेळीपालन, शेतमाल पॅकेजिंग व विक्री, सुरण, केचई उत्पादन व विक्री या सारखे शेती पूरक व्यवसाय करून आर्थिक उन्नती केली आहे.

          पारंपरिक शेती पद्धतीत असलेले धोके लक्षात घेऊन सडक अर्जुनी तालुक्यातील छायाताई लंजे यांनी आधुनिकतेची कास धरत व तंत्रज्ञान व ठिबकचा वापर करून टरबूज पिकाचे उत्पादन घेतले आहे. सध्या टरबूजचा सिझन असून यातून त्यांना आर्थिक लाभ होत आहे. सिंदीपार येथील चंद्रशेखर लंजे यांनी सुद्धा तंत्रज्ञान व ठिबकचा वापर करून टरबूज व ॲपल बोर उत्पादन घेतले आहे. गोरेगाव तालुक्यातील मनिराम पटले यांनी सेंद्रिय भात उत्पादन व भाजीपाला तर शशिलाताई पुंडे यांनी श्री व सगुना पद्धतीने भात, मोहरी व करडई तेलबियांची लागवड करून पीक बदल घडवून आणला. जिल्ह्यातील या सर्व प्रगतिशील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सहकार्याने पारंपरिक शेती पद्धतीला बगल देत प्रयोगशील शेती करून उन्नती साधली व अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

Exit mobile version