मुंबई(वृत्तसंस्था)दि.19 – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. राज्याला केंद्र सरकार सहाय्य करेलच. पण टोलवाटोलवी न करता आधी राज्य सरकारने मदतीची घोषणा करावी, असे म्हटले आहे.आज फडणवीस यांनी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी पावसाच्या पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढला.
फडणवीस यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी आपल्या दौऱ्याला बारामतीमधून सुरुवात केली. यावेळी, त्यांनी यावेळी काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, फडणवीस यांनी पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
कोणीच सोयीस्कर राजकीय भूमिका घेऊ नये. सगळ्याच नेत्यांना मदत कशी मिळते हे माहिती आहे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्राच्या मदतीची वाट राज्य सरकारने बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी आधी सांगावे, असेही फडणवीस म्हणाले.