Home Top News जात प्रमाणपत्राच्या नमुन्यात होणार बदल

जात प्रमाणपत्राच्या नमुन्यात होणार बदल

0

बुलडाणा- अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांंना लागणारे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांमध्ये बदल करण्यात आला असून आता शासनाच्या नव्या प्रपत्रानुसार जात प्रमाणपत्र विद्यार्थ्यांंना मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यात नव्या प्रमाणपत्र वाटपाचे काम प्रायोगिक तत्वावर सुरूही करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना शैक्षणिक कामासाठी जातीचे प्रमाणपत्र काढावे लागते. या जात प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांंना विविध शिष्यवृत्त्या मिळत असतात. यासोबतच भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांसाठी आम आदमी विमा योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीही जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या प्रमाणपत्रामध्ये शासनाने बदल केला असून नव्या स्वरूपात जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समितीने नव्या जात प्रमाणपत्राची मागणी केल्यास मोठा गोंधळ होऊन विद्यार्थ्यांंना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंंडही सहन करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात असाच प्रकार घडला आहे. तेथील विद्यार्थ्यांंना नव्याने जात वैधता प्रमाणपत्र काढण्याची अट लागू केल्यामे विद्यार्थ्यांंना शैक्षणिक कामं सोडून जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव तयार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी जुन्या जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळविली, त्यांनासुध्दा नवे जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यासंदर्भात समाजकल्याण विभागाकडे सध्यातरी कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी अमरावती जिल्ह्यात नव्या प्रमाणपत्राची अट लागू झाली असून टप्प्यात सर्वत्र लागू होणार असल्याने विद्यार्थी वर्गात संभ्रम आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version