Home Top News गोसीखुर्द प्रकल्पातील भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई करा

गोसीखुर्द प्रकल्पातील भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई करा

0

पत्रकार परिषद : गोविंद भेंडारकर यांची मागणी
चंद्रपूर : पूर्व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गोसीखूर्द प्रकल्प वरदान ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उजवा कालव्याचे काम अजूनही रेंगाळलेले आहे. कंत्राटदारांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. प्रकल्पांतर्गत आमदार नितेश भांगडिया व आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या पन्नास नोंदणीकृत कंपन्या असून या प्रकल्पातील डझनभर कंत्राट त्यांच्या विविध कंपन्याच्या नावाखाली सुरु आहे. मागील दहा वर्षात एकही कामे पूर्णत्वास नेले नाही. उलट गोसीखूर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामध्ये अधिकार्‍यांशी संगणमत करून भ्रष्टाचार झाल्याचा मेन्ढेगीरी अहवालामध्ये उल्लेख झाल्यानंतर भ्रष्टाचार झाला, हे मान्य करून आमदार भांगडीया स्वत:हून काम पूर्ण करून देत आहेत. अशा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याऐवजी त्यांना अधिकारी शाबासकी म्हणून पुन्हा काम देत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी गोसीखूर्द (इंदिरासागर) प्रकल्प संघर्ष समितीचे केंद्रीय संयोजक तथा गोसीखुर्द प्रकल्प भूसंपादन समितीचे सदस्य अँड. गोविंद भेंडारकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्यात आला नाही. एवढेच नाही तर प्रकल्पामध्ये कर्मचार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. मात्र ते भरण्यास शासन कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गोसीखुर्द प्रखल्पातील अधिकारी व भुसंपादन तथा अन्य अधिकार्‍यांच्या लालफितशाहीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. याचा परिणाम शेतकर्‍यांवर पडला आहे. जिल्ह्याला केंद्रात आणि राज्यातील मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सात तालुके सिंचनांतर्गत येत असल्यामुळे व मोठय़ा प्रमाणात गोसीखुर्द प्रखल्पाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार असल्याने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर तसेच वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष देऊन प्रकल्पाच्या कामाला गती आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भ्रष्ट कंत्राटदारावर कारवाई करावी, अन्यथा भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा अँड. गोविंद भेंडारकर यांनी यावेळी दिला. यावेळी किशोर पोतनवार, अँड.हिराचंद बोरकुटे, उमाकांत धांडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version