
भंडारा-एकाच दिवशी एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातिल माटोरा गावात घडली. ३ – ३ तासाच्या फरकाने वृद्ध आई- वडिलांसह मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे माटोरा गावातील बोरकर कुटुंबावर एकाच दिवशी तीन वेळा अंत्यसंस्कार करण्याची दुर्देवी वेळ आली असून बोरकर परिवारावर काळाने घाला घातल्याने गावात प्रत्येक जण हळहळत आहे.
माटोरा गावात ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत बोरकर कुटुंबातील ७ सदस्यांपैकी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सेवानवृत्त शिक्षक महादेव बोरकर (९0) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांचा अंत्यसंस्कार उरकत घरी पोहचत नाही तर पार्वताबाई बोरकर (८५) यांचाही त्याच दिवशी ३ तासांच्या फरकाने मृत्यू झाला. आलेल्या कुटुंबातील लोकांना परत पार्वताबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करावा लागला.
आईचा अंत्यसंस्कार आटोपून येत नाही तोच मृतकांचा मुलगा विनायक बोरकर (५५) यांचीही ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे परत दोघांवर अत्यंसंस्कार करून परतलेल्या नातेवाईकांना आता मुलांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्याची वेळ आली.
अवघ्या काही तासातच आई- वडील आणि पाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विनायक बोरकर यांच्या मागे पत्नी, ३ मुले असा आप्त परिवार आहे. यावेळी एकाच कुटुंबातील तीन धगधगत्या चिता पाहून अनेकांना शोक अनावार झाला होता.