42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातून निघणार 16 जून रोजी मोर्चा-संभाजीराजेंची घोषणा

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातून निघणार 16 जून रोजी मोर्चा-संभाजीराजेंची घोषणा

0
55

blank

रायगड,दि.06-| तुम्ही माझा संयम पाहिला. आता मी संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला आहे. 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संभाजीराजे बोलत होते.

आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे, असं संभाजीराजे म्हणाले. तसेच 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही संभाजीराजेंनी यावेळी केली आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही, असं संभाजीराजे म्हणालेत.

blank